राजस्थानच्या चुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे येथील सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण देतो असं सांगून चक्क शेतातील कामे करायला लावल्याचे उघडकीस आले आहे. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर सीबीईओने मुख्याध्यापकावर कारवाईचे आदेश दिले आहेत. याबाबतचे वृत्त आजतकने दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सरदारशहरातील रुपलीसर गावतील आहे. येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदीश प्रसाद शर्मा यांनी शाळेत शिकणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून देतो असं सांगून दोन दिवस शेतातील बाजारीच्या पिकाची कापणी करायला लावली.
जेव्हा मुलांच्या पालकांना शेतात काम करायला लावल्याची माहिती समजली तेव्हा त्यांनी मुख्याध्यापकांना फोन केला तेव्हा मुख्याध्यापक म्हणाले, मुलांना कामानुसार मोबदला देईन. यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी शाळेच्या गेटला कुलूप लावून दोन तास निदर्शने करत मुख्याध्यापकांना शाळेतून काढून टाकण्याची मागणी केली.
काम केलं पण मोबदला मिळालाच नाही – विद्यार्थी
निषेधादरम्यान, १२ वीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, “मुख्याध्यापकांनी आम्हाला सांगितले की, ‘माझ्या शेतातील पिकाची कापणी करायची आहे, याच्या बदल्यात तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण देईन आणि कामाचे पैसेही मिळतील.’ आम्ही एक दिवस काम केले, पण आम्हाला काहीही दिलं नाही. मुख्याध्यापकांनी पैसे दुसऱ्या दिवशी देतो असे सांगितले. परंतु, अद्याप आम्हाला पैसे दिले नाहीत.”
दरम्यान, सुरुवातील मुख्याद्यापकाने सर्व आरोप फेटाळले, मात्र पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा विरोध पाहता त्यांनी विद्यार्थ्यांना शेतात काम करायला लावल्याचं कबूल केलं. दरम्यान, प्राचार्य शर्मा यांची तक्रार सीबीईओ अशोक पारीक यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार कारवाईचे आदेश जारी करताना, त्यांनी मुख्याध्यापक जगदीश प्रसाद शर्मा यांना रूपलीसर शाळेमधून काढण्यात आलं असून या प्रकरणाची चौकशी सुरू असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. असंही अशोक पारीक यांनी सांगितलं.