सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ आपणाला आपल्याच आसपास राहणाऱ्या लोकांची हालाखीची परिस्थिती दाखवून देतात. सध्या सोशल मीडियावर राजस्थानमधील असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लहान मुलांना पाण्यासाठी किती जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे, हे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आजही आपल्या देशातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागत आहेत याचा अंदाजदेखील येत आहे.
व्हायरल व्हिडीओमधील मुलांना पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत असल्याचं दिसत आहे. त्यांना पाण्यासाठी कित्येक किलोमीटर चालत जावं लागत आहे, शिवाय खोल विहिरीतून पाणी काढाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. खरंतर राजस्थानमध्ये भारतातील काही सांस्कृतिक वारसा असलेल्या स्थळांचा समावेश आहे. हे राज्य पर्यटनासाठी प्रसिद्ध असूनही, येथील काही गावांमधील वास्तव किती भयानक आहे. हेच या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
हेही पाहा- रील बनवण्याच्या नादात गमावला जीव; भरधाव रेल्वेने दिली धडक, हृदय पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
इन्स्टाग्रामवर चित्रपट निर्माते यश चौधरी यांनी या मुलांचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याद्वारे त्यांनी थारच्या वाळवंटातील गावकऱ्यांना पाणी आणण्यासाठी कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागतं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओमध्ये दोन लहान मुलं एका अरुंद आणि खोल विहिरीतून पाणी बाहेर काढतात आणि नंतर ते उंटाच्या पाठीला जोडलेल्या पाण्याच्या पिशव्यामध्ये ओतताना दिसत आहेत. शिवाय हे पाणी घरी घेऊन जाण्यासाठी ते पायी जात असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “थारच्या वाळवंटातील लोंकाचे जीवन अडचणींनी भरलेले आहे. मित्रांनो, २०२३ चालू आहे, आपण चंद्रावर जायच्या गोष्टी बोलत आहे, परंतु थारच्या वाळवंटातील जीवन इतके सोपे आहे. ही मुले दररोज ४ ते ५ किलोमीटर चालत जातात आणि उंटावरून पाणी आणतात. तर उन्हाळ्यात दुपारनंतर पाणी आणताना त्यांची सर्वात वाईट अवस्था होते. लहान वयात खेळणं प्रत्येकाच्या नशीबी नसते, काही मुलांवर लहान वयातच खूप जबाबदाऱ्या येतात. ही केवळ एका गावाची गोष्ट नाही, तर राजस्थानातील थारमधील जवळपास प्रत्येक गावाची हीच परिस्थिती आहे. मित्रांनो, हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला पाण्याची खरी किंमत कळेल आणि राजस्थानच्या लोकांची ही कहाणी सर्वांपर्यंत पोहोचेल.”
या व्हिडिओला आतापर्यंत १४ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर एका नेटकऱ्याने लिहिलं, “जेव्हा देशातील लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नाही, तेव्हा चंद्रावर जाऊन काय उपयोग?” तर दुसऱ्याने लिहिलं, “जेव्हा मी अशी स्थिती पाहतो तेव्हा वाटते की, अनेक नद्या अजूनही चुकीच्या दिशेने वाहत आहेत.”