Rajasthan Teacher Video : शिक्षक विद्यार्थ्यांना समजून घेत विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचे काम करतो. त्यामुळे भारतात आई-वडिलांनंतर शिक्षकांना गुरूचे महत्त्वपूर्ण स्थान दिले जाते. मात्र, गुरूची प्रतिमा डागाळणारी एक घटना राजस्थानमधून समोर आली आहे. राजस्थानमधील चितौडगडमधील एका शाळेतील शिक्षक आणि शिक्षिकेचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाळेच्या स्टाफ रूममध्ये शिक्षक-शिक्षिका एकमेकांना मिठी मारत अश्लील चाळे करताना दिसतायत. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. स्टाफ रूममध्ये बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन्ही शिक्षकांचे अश्लील कृत्य रेकॉर्ड झाले आहे.
व्हिडीओमधील दोन्ही शिक्षकांची ओळख पटलीय. हे दोन्ही शिक्षक राजस्थानच्या चित्तोडगड जिल्ह्यातील सालेरा तालुक्यातील अजोलिया खेडा ग्रामपंचायतीमधील गंगरार ब्लॉक येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात कार्यरत होते. मात्र, या धक्कादायक घटनेनंतर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी दोन्ही शिक्षकांचे तत्काळ निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे.
अरविंदनाथ व्यास असे या पुरुष शिक्षकाचे नाव आहे, जो राजस्थानमधील या शाळेतील लेव्हल- २ सामाजिक शास्त्राचा शिक्षक होता.
ग्रामस्थांकडून अश्लील कृत्याचा निषेध
ही धक्कादायक घटना उघडकीस येताच स्थानिकांनी संबंधित शिक्षकांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. शाळेतील दोन्ही शिक्षकांकडून घडलेल्या अश्लील कृत्याचा ग्रामस्थांनी निषेध करीत शैक्षणिक जागेची नैतिक अखंडता टिकली पाहिजे. त्यामुळे शाळेसारख्या पवित्र ठिकाणी असे कृत्य करणाऱ्या शिक्षकांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याने वेगवेगळ्या दिवसांचे दृश्य रेकॉर्ड झाले आहे. हे दोन्ही शिक्षक सरकारी शाळेत त्यांच्या ड्युटीच्या वेळेत अनेक वेळा अशा प्रकारे अश्लील कृत्य करीत असल्याचे दिसून आले. या अश्लील कृत्याचा संपूर्ण व्हिडीओ समोर आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
व्हायरल व्हिडीओत पुरुष शिक्षक व्यास सोफ्यावर बसलेल्या महिला शिक्षिकेला जवळ ओढत प्रेमाने मिठी मारताना आणि तिचे चुंबन घेताना दिसत आहे.
डिसेंबर २०२४ चा टाइम स्टॅम्प असलेल्या दुसऱ्या क्लिपमध्ये तो शिक्षक त्या शिक्षिकेजवळ जात, तिच्या डेस्कसमोर उभा राहून तिचे चुंबन घेताना दिसला. त्यानंतरच्या इतर व्हिडींओममध्येही दोन्ही शिक्षक अयोग्य वर्तन करताना दिसत आहेत.