काळाबरोबर अनेक गोष्टी बदलत गेल्या. चलनाची पद्धतही बदलत गेली. आता रोख रक्कम, चिल्लर सोबत बाळगण्याऐवजी सर्वच जण डिजीटल पेमेंटचा पर्याय स्वीकारत आहेत. गुगल पे, फोन पे, पेटीएम अशा अनेक प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून लोक पेमेंट करू लागले आहेत. लोकांसोबतच आता भिकारी सुद्धा डिजीटल होत असल्याचं चित्र दिसत आहे.
बिहारचा भिकारी राजू पटेल हा त्यातलाच एक! मंगळवारी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, राजू पटेल यांनी भीक मागण्याची पारंपारिक पद्धत सोडली आणि फोनपे, डिजिटल वॉलेट आणि ऑनलाइन पेमेंट अॅप वापरण्यास सुरुवात केली. पटेल यांच्या कल्पकतेने खूश झालेल्या काही लोकांनी त्यांना “भारताचा पहिला डिजिटल भिकारी” असे नाव दिले आहे. दरम्यान, तंत्रज्ञान आणि डिजिटल साक्षरतेने गरिबी दूर करण्याकडे एक पाऊल उचलले आहे याकडेही काही लोकांनी लक्ष वेधले.
“हे चांगले आणि वाईट दोन्ही आहे. डिजिटायझेशन जनतेपर्यंत पोहोचले हे चांगले आहे. भिकारी कमी करण्यासाठी, नोकर्या देण्यासाठी सरकार पुरेसे करत नाही हे वाईट आहे आणि हे लोक स्वतःला भीक मागण्यात समाधान मानतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी स्वत: साठी काही करत नाहीत,” एका ट्विटर यूजरने आपलं मत मांडलं आहे.
बेतिया येथील काही ट्विटर यूजर्सनी पटेल हे बिहारच्या बेतिया रेल्वे स्थानकावरील लोकप्रिय व्यक्ती असल्याचं सांगितलं आहे. असे नवीन मार्ग धुंडाळण्याची गरज स्पष्ट करताना पटेल यांनी ANI ला सांगितले की, “अनेक वेळा लोकांनी मला भीक देण्यास नकार दिला की त्यांच्याकडे रोख रक्कम नाही. ई-वॉलेटच्या जमान्यात आता रोख रक्कम बाळगण्याची गरज नसल्याचे अनेक प्रवाशांनी सांगितले. यामुळे मी बँक खातं आणि ई-वॉलेट खातं सुरू केलं.