भारताचे ‘वॉरन बफे’ अशी ओळख असलेले व भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे आज निधन झाले . वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांना मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीस शेअर बाजारामध्ये पाच हजारांच्या गुंतवणुकीसह त्यांनी सुरुवात केली होती. फोर्ब्स मासिकानुसार, झुनझुनवाला यांची शेअर बाजारातील गुंतवणूक ५.८ अब्ज डॉलर्स (सुमारे ४६ हजार कोटी रुपये) आहे. टाटा, टायटन सह अनेक बड्या कंपन्यांचे शेअर्स झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट आहेत.
या यशस्वी प्रवासात राकेश झुनझुनवाला यांनी वापरलेले काही गोल्डन नियम आपण आज पाहणार आहोत. आपणही जर शेअर मार्केट गुंतवणूकदार असाल तर मोठा फायदा मिळवण्यासाठी आपण हे काही झुनझुनवाला यांचे प्रसिद्ध फंडे आवर्जून लक्षात ठेवा.
1.अभ्यासाला पर्याय नाही
झुनझुनवाला यांच्या यशाचं पहिलं गुपित म्हणजे खरेदी करताना आपण सारासार विचार करण्याला पर्याय नाही. तुम्ही शेअर विकत घेताना व विकताना दोन्ही वेळेस अभ्यासपूर्वक निर्णय घ्यायला हवे. काही वेळेला कंपनीच्या कामाविषयी असमाधानकारक माहिती समोर येते अशावेळी घाबरून न जाता एक गुंतवणूकदार म्हणून आपण विश्वास ठेवायला हवा. परिस्थिती बिघडत असेल तर आधी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करा
2. भावनांचं ओझं करा बाजूला
जेव्हा राकेश झुनझुनवाला ५० वर्षांचे झाले, तेव्हा त्यांना एका पत्रकाराने विचारले की, एक प्रमुख गुंतवणूकदार म्हणून ते (कधी) त्यांच्या कोणत्याही स्टॉकच्या बद्दल भावूक होतात का? यावर झुझुनवाला यांनी सांगितले की, भावना या जिवंत नात्यात असाव्यात, माझी पत्नी, मुलं एखाद वेळेस मैत्रिणीच्या बाबत मला भावना आहेत पण माझ्या स्टॉक विषयी मी असा पूर्णतः भावनिक होऊन विचार करत नाही किंवा भावना असल्या तरी त्या योग्य कारणाने वेगळ्या फायद्यासाठी मी बदलूच शकतो.
यातून झुनझुनवाला यांच्या गुंतवणुकीचं गुपित समोर येतं, शेअर बाजारात गुंतवणूक करताना (सामान्यत: दीर्घ मुदतीसाठी), तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल, तर तुमच्या स्टॉकच्या कल्पनांबद्दल कधीही भावनिक होऊ नका आणि गरज पडल्यास वेळेवर शेअर विकायला तयार राहा.
3. संयम ही यशाची गुरुकिल्ली आहे
तुम्हाला प्रसिद्धी एका रात्रीत मिळते यश नाही, कारण यशासाठी मेहनत करणे अनिवार्य आहे. त्यामुळे झुनझुनवाला म्हणतात की तुम्ही अनेक वर्षे संशोधन, परिश्रम करून हळूहळू गुंतवणुकीचे पैलू समजू शकाल. त्यामुळे एका नफ्याने हुरळून जाऊ नका किंवा एका तोट्याने खचूनही जाऊ नका. झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये २५- ३०% पेक्षा जास्त वेळा चुका झाल्या, परंतु त्यांनी या चुका शिकवण म्हणून वापरल्या होत्या
4. प्रवाहाच्या विरुद्ध चाल
झुनझुनवाला नेहमी प्रवाहाच्या विरोधात जाण्यावर विश्वास ठेवत होते ते म्हणायचे – जेव्हा इतर विकत असतील तेव्हा विकत घ्या आणि इतर विकत घेत असतील तेव्हा विका. यामुळे एक वेगळा विचार तुम्हाला लॉन्ग टर्मसाठी बाजारात टिकून राहायला मदत होईल
5. अवास्तव आकड्यांना बळी पडू नका
शेअर मार्केट मध्ये कधीही अवाजवी मुल्यांकनात गुंतवणूक करू नका. प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या कंपन्यांसाठी कधीही धावू नका. अशाप्रकारे, जेव्हा जेव्हा तुम्ही अवास्तव मूल्यमापनावर स्टॉक ट्रेडिंग पाहता तेव्हा त्याकडे जाणे टाळा कारण अनेकदा हे आकडे फोल असतात व तुम्ही तुमचे कष्टाने कमावलेले पैसे गमावू शकता.
Share Market Tips: शेअर मार्केटमध्ये नवीन आहात? गुंतवणूक करण्याआधी कंपनीचे असे करा परीक्षण
साधी राहणी आणि हुशार विचारसरणी यामुळे त्यांना शेअर मार्केटचे किंग म्हणून ओळखले जात होते झुनझुनवाला यांच्या निधनानंतर देशातील अनेक स्तरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.