Raksha Bandhan 2023 Khan Sir: रक्षाबंधनाचा सोहळा काल भारतात अत्यंत उत्साहात पार पडला. रक्षाबंधनावरून तुम्हाला प्रसाद ओकच्या अभिनयाने नटलेला धर्मवीर सिनेमा आठवत असेल ना? धर्मवीर आनंद दिघे यांच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी शेकडो भगिनी रांगेत उभ्या असायच्या. हात दिसणारही नाही इतक्या राख्या त्यांच्या हातावर बांधल्या जायच्या. चित्रपटात दाखवलेला तोच सीन कालच्या रक्षाबंधनाच्या वेळी सुद्धा पाहायला मिळाल्याची चर्चा सध्या ऑनलाईन व्हायरल होणाऱ्या एका फोटोवरून होत आहे. ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग घेणारे प्रसिद्ध खान सर यांनी आपल्या विद्यार्थिनींकडून राखी बांधून घ्यायचे ठरवले होते. यावेळी शंभर- दोनशे नव्हे तर तब्बल ७००० राख्या आपल्या मनगटावर बांधल्या गेल्याचे खान सर सांगत आहेत.
पाटणा येथे राहणाऱ्या खान सरांनी आपल्या कोचिंग सेंटरमध्येच रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला त्याच्या विविध बॅचमधील तब्बल १०,००० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. याच वेळी सुमारे ७००० विद्यार्थिनींनी त्यांच्या हातावर राखी बांधली. यापूर्वी असे कधीच झाले नसल्याने खास सर आता हा जागतिक रेकॉर्ड असल्याचे सुद्धा म्हणत आहेत. साधारण अडीच तास सुरु असलेल्या या कार्यक्रमात खान सरांनी राखी बांधणाऱ्या प्रत्येकी बहिणीशी स्वतः संवाद साधला.
आजतकशी बोलताना, खान सरांनी सांगितले, की त्यांना सख्खी बहीण नाही, म्हणून त्यांनी या सर्व मुलींना आपल्या बहिणी मानण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दावा केला की, दरवर्षी त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांकडून राख्या बांधल्या जातात. आपल्याइतक्या राख्या जगात कोणीही बांधल्या नसतील.
हे ही वाचा << तृतीयपंथींच्या मृतदेहाला चपलांनी मारतात का? गौरी सावंत यांनी स्पष्टच सांगितलं उत्तर, म्हणाल्या, “श्रीमंत…”
दरम्यान, खान सरांनी सांगितले केले की “या मुली वेगवेगळ्या ठिकाणांहून येतात आणि त्यांच्या कोचिंग सेंटरमध्ये त्यांचे कुटुंब सोडून शिक्षण घेतात. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांची उणीव भासू नये यासाठी मी त्यांचा भाऊ होण्याचा निर्णय घेतला. माझ्या ‘बहिणींना’ यश मिळवून देण्यासाठी आणि शिक्षणाद्वारे चांगल्या नोकऱ्या मिळवून देण्याचे माझे ध्येय आहे.”