Ram Mandir VIP Entry Scam : अखेर भारतासह जगभरातील कोट्यवधी रामभक्तांची इच्छा आज पूर्ण झाली. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान झाले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाल्यानंतर देशातील रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे राम मंदिराच्या नावाखाली भाविकांच्या भावनांशी खेळून ऑनलाइन फसवणुकीचा प्रयत्न सुरू आहे. ठग राम मंदिराच्या नावाखाली लोकांची ऑनलाइन फसवणूक करीत आहेत. याच ठगांपासून सावध करण्यासाठी आता सरकारने मीम्सची मदत घेतली आहे. सरकारने मजेशीर मीम्सच्या मदतीने लोकांना महत्वाच्या सूचना केल्या आहेत. हे मीम्स पाहून जरी तुम्हाला हसू आले तरी त्यातून देण्यात आलेल्या सूचना फार महत्त्वाच्या आहेत.
परेश रावल, सुनील शेट्टी व अक्षय कुमार यांच्या सुप्रसिद्ध हेराफेरी या चित्रपटातील डायलॉगचा वापर करून सरकारने एक मजेशीर मीम शेअर केले आहे. त्यातून त्यांनी भाविकांना ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या लोकांच्या जाळ्यात न फसण्याचा इशारा दिला आहे. सरकारच्या सायबर दोस्त नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून शेअर केल्या गेलेल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे की, जर व्हॉट्सअॅपवर राम मंदिरातील व्हीआयपी एंट्रीबाबत कोणतीही लिंक आली, तर त्यावर अजिबात क्लिक करू नका; अन्यथा तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. त्यामुळे कोणत्याही अनोळखी नंबर किंवा वेबसाइटच्या लिंकवर क्लिक करू नका.
त्याशिवाय अभिनेत्री अनुष्का शर्माचा एका चित्रपटातील फोटोवरून एक मजेशीर मीम पोस्ट केली गेली आहे; ज्यातूनही त्यांनी लोकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
दरम्यान, काही दिवसांपासून राम मंदिरात दर्शनासाठी व्हीआयपी पास मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची ऑनलाइन फसवणूक केली जात आहे. त्यात लोकांना व्हॉट्सअॅपवर बनावट वेबसाइटची लिंक पाठवून ऑनलाईन पेमेंट करण्यास सांगितले जात आहे. या पोस्टचा दाखला देत, सायबर क्राइमने नागरिकांना संशयास्पद लिंकपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.