Ram Navami 2024 In Ayodhya : १७ एप्रिलच्या रामनवमीचा उत्साह देशभरात शिगेला पोहोचलेला आहे. राम मंदिर निर्मितीनंतर साजरा होणारा हा पहिलाच जन्मोत्सव असल्याने लाखोंच्या संख्येनं भाविकांच्या गर्दीची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर रामनवमी संदर्भात श्रीराम मंदिर ट्रस्टने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून १५ ते १८ एप्रिलपर्यंत व्हीआयपी दर्शनावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय रामनवमीला भाविकांना इतर अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. ज्या भाविकांनी १५ ते १८ एप्रिल दरम्यान ऑनलाइन पाससाठी अर्ज केले होते, ते सर्व पासही रद्द करण्यात आले आहेत. राम मंदिर ट्रस्टच्या सरचिटणीसांनी रामलल्लांच्या जयंतीनिमित्त लोकांना मोबाइल फोन सोबत आणू नका, असे आवाहन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्रस्टने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रामनवमीला होणाऱ्या गर्दीचा विचार करता कोणतेही विशेष दर्शन पासेस आणि आरतीचे पासेस न देण्याचा निर्मय राम मंदिर तीर्थक्षेत्राने घेतला आहे. भाविकांना १५ एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीत आरतीसाठी सोयीस्कर दर्शन घेता येणार नाही किंवा व्हीआयपी पासही उपलब्ध होणार नाहीत. सर्व रामभक्तांना एकाच रांगतून दर्शन घेण्याची विनंती तीर्थक्षेत्राकडून करण्यात आली आहे.

२२ जानेवारीला मंदिर खुलं झाल्यापासून दररोज साधारणपणे एक लाख भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी येतात. पण यंदाची रामनवमी रेकॉर्डब्रेक गर्दीची ठरण्याची शक्यता आहे. रामनवमीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोईच्या दृष्टीने राममंदिर तीर्थक्षेत्राने काही विशेष सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. सोबतच दर्शनासाठी येताना काही विशेष सूचनांचं पालन करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे.

पहाटे ३:३० पासूनच दर्शन रांगा खुल्या

रामनवमीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरच दर्शन रांगेत उभं राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. रामलल्लाची मंगला आरती सुरू होण्याच्या एक तास आधीच भाविकांना दर्शनासाठी रांग लावता येणार आहे.

हेही वाचा >> “इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स

उन्हापासून काळजी घ्या!

अयोध्येतला पारा सध्या चाळीशीपार आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येकानं काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मंदिर परिसरात भक्तांचे पाय उन्हाने पोळू नयेत यासाठी खास मॅटही अंथरल्या गेल्या आहेत. भाविकांनी आपलं डोकं झाकून उन्हापासून स्वतःच रक्षण करावं असं आवाहनही करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram navami 2024 ayodhyas ram temple trust issued guidelines banned vip darshan srk