कॉलेज, कॉलेज कॅम्पस, दरवर्षी होणारे फेस्टिव्हल, खेळांच्या स्पर्धा आणि अजून बऱ्याच गोष्टी आजची तरुणाई हमखास मिस करत आहे. कॉलेज फेस्टीव्हल, महोत्सव हे तर कॉलेज लाइफ मधला महत्त्वाचा इव्हेंट असतो. कोविड-१९ मुळे मागच्या वर्षांपासून कॉलेज बंद असल्या कारणामुळे कॉलेजमध्ये कोणतेही कार्यक्रम होत नाहीयेत. पण यंदा हळू हळू ऑनलाइन पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम सुरु होत आहेत. रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय आणि महर्षि व्यास विद्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी संस्कृत साहित्यातील विषयांवर महोत्सव आयोजित केले जातात. यापूर्वी भास-महोत्सव, रस-महोत्सव, रामायण-महोत्सव, महाभारत-महोत्सव, शांकर-महोत्सव या महोत्सवांचे यशस्वी आयोजन केले गेले आहे. या प्रथेला अनुसरून यावर्षी संस्कृत भाषेतील ‘कथा-साहित्य’ या विषयावर ६ आणि ७ ऑगस्ट रोजी ‘कथा-महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.
कसा होणार महोत्सव?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच हा महोत्सव डिजिटल पद्धतीने होणार आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्रापुरताच हा मर्यादित न राहता आता या महोत्सवाला महाराष्ट्राबाहेरील अगदी परदेशातूनही रसिक सहभागी होउ शकतात.संस्कृत साहित्यातील कथा या विषयाचा सांगोपांग विचारमंथन होईल अशी ६ व्याख्याने आयोजित केली आहेत व त्यासाठी मान्यवर वक्त्यांना निमंत्रित केले आहे.
विषय आणि वक्ते
पहिल्या दिवशी ६ ऑगस्टला ४ वाजता या महोत्सवाला सुरुवात होईल. बीजभाषण – डॉ. मंजूषा गोखले, संस्कृत साहित्यातील अद्भुत कथा – डॉ अंजली पर्वते, संस्कृत साहित्यातील कथांची शिल्पांकने – डॉ अंबरीश खरे अशी व्याख्याने होतील. तर दुसऱ्या दिवशी ७ ऑगस्टला वैदिक आणि पौराणिक कथा – डॉ. विनया क्षीरसागर, पुराकथा ते कादंबरी,प्रवास कथेचा आणि लेखनाचा – डॉ अरुणा ढेरे आणि संस्कृत साहित्यातील शास्त्र कथा – डॉ निर्मला कुलकर्णी अशी व्याख्याने होतील. प्रसिद्ध कथाग्रंथांच्या जन्मकथांचा इतिहासही व्याख्यानांबरोबरच नृत्य संगीत रूपाने सादर केला जाणार आहे.या महोत्सवाला रसिकांनी नोंदणी च्या माध्यमातून भरगोस प्रतिसाद दिला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. Ruia Sanskrit Department – SarjanaSanskritam या युट्युब चॅनेलवरून कार्यक्रमात सहभागी होता येईल.