झारखंडमधील प्राणीसंग्रहालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील वाघिणीच्या पिंजऱ्यात पडलेल्या एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. भगवान बिस्रा बायोलॉजिकल पार्कमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, झारखंडमधील ओरमानजी येथील प्राणीसंग्रहालयाच्या भिंतीजवळ असणाऱ्या झाडावर एक व्यक्ती वाघ पाहण्यासाठी चढला. त्यावेळी तोल गेल्याने हा २२ वर्षीय तरुण अनुष्का वाघिणीच्या पिंजऱ्यात पडला. वाघिणीने या तरुणावर हल्ला केला अशी माहिती प्राणीसंग्रहालयात काम करणारा कर्मचारी रामजीत याने दिली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार प्राणीसंग्रहालयाच्या प्रशासनाने या तरुणाला वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आलं नाही. या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस या तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा तरुण एकटाच आला होता की त्याच्यासोबत कोणी होतं का याचा पोलीस शोध घेत आहेत. यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

मागच्या वर्षी दिल्लीतील प्राणीसंग्रहालयामध्ये एक २१ वर्षीय तरुण सिंहाच्या पिंजऱ्यामध्ये उतरला होता. मात्र सुदैवाने कर्मचाऱ्यांनी वेळीच या तरुणाला सुखरुप बाहेर काढले. हा तरुण मानसिक रुग्ण असल्याची माहिती नंतर समोर आली होती. मात्र दिल्लीतील या मुलाप्रमाणे रांचीतील हा तरुण नशिबवान ठरला नाही आणि उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला.

Story img Loader