एका रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन पैसै मिळवून उदरनिर्वाह करणाऱ्या रानू मंडल एका रात्रीत स्टार झाल्या. कधी भीक मागताना गाणं गाणारी व्यक्ती थेट बॉलिवूडमध्ये पोहोचू शकेल हा विचार रानू मंडल यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल. त्यांच्या व्हायरल व्हिडीओनंतर सर्वांच्याच तोंडावर रानू मंडलचं नाव येत होतं. मधल्या काही काळात त्यांची लोकप्रियता कमी झाली होती. पण आता त्यांचा नव्या अंदाजातला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रानू मंडल यांनी रेड टी शर्ट परिधान केलेला असून सध्या ट्रेंडवर असलेल्या ‘मनिके मागे हिते’ या श्रीलंकन गाण्यावर गाणं गायलंय.
यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध यूट्यूबर Rondhon Porichoy ने हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये रानू मंडल यांनी लाल रंगाचं टी शर्ट आणि पॅन्ट परिधान केलेली दिसून येत आहे. योहानी दिलोका डिसिल्वा हिने गायलेलं ‘मनिके मागे हिथे’ या श्रीलंकन गाण्याने साऱ्यांनाच वेड लावलंय. यात रानू मंडल सुद्धा मागे नाहीत. त्यांनी आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये हे गाणं गायलंय. या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. रानू मंडलचा हा नवा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीला पडताना दिसून येतोय.
या व्हिडीओला आतापर्यंत ५१ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर चार हजार पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं असून कमेंट्स सेक्शनमध्ये रानू मंडलच्या नव्या स्टाइलचं कौतुक करत आहेत.
पुन्हा एकदा रानू मंडल चर्चेत
सोशल मीडियावरील नेटकऱ्यांना रानू मंडलचा हा अंदाज खूपच आवडलाय. रानू मंडल यांना आता हवी तितकी लोकप्रियता मिळत नाही, असं काही जणांचं म्हणणं आहे. दोन वर्षापूर्वी रानू मंडल पश्चिम बंगालमधील राणाघाट रेल्वे स्टेशनवर ‘एक प्यार का नगमा हैं’ हे गाणं गात होत्या. त्यावेळी प्रत्येकजण त्यांचं हे गाणं आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट करत होता. त्यानंतर त्यांचा गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि बघता बघता त्या सोशल मीडियावरील स्टार बनल्या. इतकंच नव्हे तर त्यांना बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी देखील मिळाली. पण त्यानंतर काही कारणांमुळे त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आणि त्यांची वाढलेली लोकप्रियता दिवसेंदिवस कमी होऊ लागली. रानू मंडल यांच्या या नव्या व्हिडीओबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे प्रतिक्रियामध्ये नक्की कळवा.