आपल्याला कुठेतरी महत्वाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचायचे असते, मात्र नेमक्या अशाचवेळी आपल्याला प्रचंड ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. मोठमोठ्या शहरांमध्ये अशा ट्रॅफिकमुळे, अपेक्षित ठिकाणी पोहोचण्यास उशीर होणे ही तर फारच सामान्य बाब झाली आहे. तुम्ही जर मुंबई, पुणे किंवा देशाचा सर्वात मोठा आयटी हब म्हटल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला या गोष्टी अगदीच सवयीच्या झाल्या असतील. बंगळुरूच्या अशाच एका ट्रॅफिकमधील एक किस्सा एक्स या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
या व्हायरल पोस्टचे कारण म्हणजे, रॅपीडोचा एक ड्रायव्हर आहे. बंगळुरूमध्ये होणाऱ्या प्रचंड ट्रॅफिकबद्दल आपल्या सर्वांनाच माहीत आहे. यामध्ये तुम्ही कितीवेळ अडकून राहू शकता, याबद्दल कुणीही काहीही सांगू शकत नाही. त्यामध्ये तुडुंब भरलेल्या बसमधून प्रवास, वाढणारे रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे या सगळ्यांमुळे प्रवाश्यांना याचा चांगलाच फटका बसत असतो. आता गर्दीमध्ये गाडी अडकलेली असताना, अशावेळी नाही म्हटलं तरी तुमच्या गाडीच्या चालकासोबत थोडेफार बोलणे हे होते. अशातच, श्रुती नावाच्या स्त्रीला तिचा रॅपीडो ड्रायव्हर हा चक्क एक कॉर्पोरेट मॅनेजर असल्याचे समजले. याबद्दल तिने आपल्या एक्स अकाउंटवरून माहिती सांगितली आहे.
हेही वाचा : प्रवाशांसाठी खुशखबर! बाईक टॅक्सी अन् रिक्षानंतर आता रॅपीडोची ‘ही’ सेवा होणार सुरु; जाणून घ्या…
तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, ‘आज बंगळुरूच्या ट्रॅफिकमधील घडलेला किस्सा आहे. एक व्यक्ती, जो रॅपीडो ड्रायव्हर आहे, तो कुणी साधासुधा व्यक्ती नसून चक्क एका चांगल्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीचा मॅनेजर आहे. प्रवाशांना परवडेल अशा दरामध्ये त्यांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोचण्यास मदत व्हावी, म्हणून तो हे काम करतो. मी पुन्हा सांगते, बंगळुरूमध्ये काहीही घडू शकते”, असे काहीसे तिने लिहिले आहे.
ही पोस्ट शेअर होताच, सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. याने नेटकऱ्यांसोबत, रॅपीडोचेदेखील लक्ष वेधून घेतले आहे. @shruwa12 या अकाउंटवरून शेअर झालेल्या पोस्टवर रॅपीडोनेही आपली प्रतिक्रिया दिली असल्याचे समजते. “श्रुती, आमच्या रॅपीडो कॅप्टनचे कौतुक केल्याबद्दल खूप धन्यवाद. तुमची पोस्ट पाहून, आमच्यासोबत भविष्यात तुमचे सर्व प्रवास असेच उत्तम होतील अशी आम्ही अशा करतो. तुम्हाला कोणत्याही मदतीची गरज लागल्यास आम्हाला मेसेज करा”, असे त्यांनी प्रतिक्रियेत लिहिले असल्याचे पाहायला मिळते.
इतक्या धकाधकीच्या आयुष्यातही जमेल त्याला मदत करावी हा विचार एखाद्याच्या मनात येतो, याबद्दल वाचून-ऐकून समाधान वाटते.