जेलीफीश म्हणजे काय याबाबत आपल्याला साधारण माहिती असते. हा मासा दिसायला आकर्षक असतो इतकीच त्याबाबत आपल्याला माहिती असते. कधी एखाद्या माशांच्या संग्रहायलात किंवा फोटो मध्ये आपण त्याला पाहिलेले असते. पण यातील काही मासे इतके आकर्षक असतात की त्यांना पहातच बसावेसे वाटते. मॅक्सिकोच्या समुद्रातील पाण्यात असाच एक अतिशय दुर्मीळ जातीचा एक जेलीफीश सापडला आहे. हा मासा इतका आकर्षक आहे की तो समुद्रात फिरताना फटाक्यांमधील भुईचक्रासारखाच दिसतो. मॅक्सिकोमधील सॉकोरो आयलंडमध्ये संशोधकांना हा जेलीफीश सापडला आहे. या माशाचे नाव हलिताप्रेस मासी असे ठेवण्यात आले आहे.

आकाराने गोल असलेला हा मासा इतका आकर्षक आहे की इंटरनेटवरही त्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एखाद्या तरंगणाऱ्या फटाक्याप्रमाणे तो दिसत आहे. या माशाचा गुलाबी आणि निळा रंग अतिशय आकर्षक असून त्याने संशोधकांचे लक्ष वेधून घेतले आहे. समुद्री जीवांबाबत आपल्याकडे कायमच उत्सुकता असते. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. फटाक्याप्रमाणे दिसणारा हा मासा अतिशय दुर्मिळ असून तो आणखी कोणत्या समुद्रात असेल याबाबत विशेष माहिती नसल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे. ट्विटरवर या माशाचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून नेटीझन्सकडून त्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

Story img Loader