गेल्याकाही दिवसांपासून न्यूयॉर्कमधल्या सेंट्रल पार्कमध्ये जगातील सर्वात सुंदर पक्ष्याचं वास्तव्य होतं. हे बदक सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय ठरलं होतं. मात्र अचानक हा पक्षी पार्क परिसरातून नाहीसा झाला आहे. तो कुठे गेला हे मात्र कोणालाच ठावूक नाही. पण या पक्ष्यांची कोणीतरी शिकार केल्याची शक्यता जास्त वर्तवण्यात येत आहे.
गडद जांभळी, मोरपंखी, केशरी तपकिरी रंगाची पिसं असणारं मँडरिन बदक हे सुंदर बदक म्हणून ओळखलं जातं. त्याच्या पंखांवरचे सुंदर रंग अनेकांना आकर्षित करतात. ऑक्टोबर महिन्यात या पक्षाचं न्यूयॉर्कमध्ये आगमन झालं. हा पक्षी मुळचा जपान, चीनचा. तो हजारो किलोमीटर दूर अमेरिकेत आला कसा असा प्रश्न सर्वांनाच पडला. अनेकांनी कुतूहलापोटी सेंट्रल पार्कला भेटही दिली.
गेल्या आठवड्यापासून या परदेशी पाहुण्याला बघण्यासाठी पक्षीप्रेमीसह असंख्य छायाचित्रकारांनी गर्दी केली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून हा पक्षी कोणाच्याही नजरेस पडला नाही. तो कुठे गेला या कल्पना कोणालाही नाही. कदाचित तो उडून गेला असावा असंही मत अनेकांनी मांडलं आहे. मात्र काहींनी या पक्षाची शिकार केली असल्याची भीती व्यक्त केली आहे. इथल्या अनेक नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे या पाहुण्या बदकाचा शोध घेण्याची मागणी केली आहे.