स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा अशी ओळख असलेल्या कोकणच्या किना-यावर मच्छीमराला अत्यंत दुर्मिळ असा मासा सापडला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विजयदुर्ग किन्या-याजवळ मुनीर मुजावर नावाच्या मच्छीमाराच्या जाळ्यात ७०० किलो वजनाचा आणि २० फूट लांब असा सॉफिश अडकला आहे. हा दुर्मिळ मासा पाहण्यासाठी लोकांनी किना-यावर तूफान गर्दी केली होती.
२० फूट लांब असलेल्या माश्याचा तोंडाकडील भाग हा करवतीसारखा असतो म्हणूनच याला सॉफिश असेही म्हणतात. तर वरच्या बाजूला टोकधार दातही असतात. याला ‘कारपेंटरफिश’ असेही म्हणतात. साधरण समुद्राच्या तळाखाली लपलेले मासे आणि आपली शिकार शोधण्यासाठी तो या लांब नाकाचा उपयोग करतो. तिच्या मदतीने तो वाळूत लपलेली आपली शिकार उकरून बाहेर काढतो. साधरण १८ ते २० फूट लांब आकाराचे हे मासे असतात. समुद्रात तसेच क्विचित प्रसंगी नदीतही हे मासे आढळतात. ही अत्यंत दुर्मिळ प्रजाती असून तिचे अस्तित्व धोक्यात आहे. आपल्या जाळ्यात जखमी अवस्थेत हा मासा अडकला होता असेही मुनीरने सांगितले. हा मासा किना-यावर आलाय हे समजताच त्याला पाहण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली होती.
डिसेंबर महिन्यात रत्नागिरीतल्या गुहागर येथे दोन मच्छीमारांना जाळ्यात फ्लाईंग फिश सापडले होते. खोल समुद्रात आढळणारे हे मासे पाण्यावर काही मीटर उंचीवर उडू शकतात. उडण्याच्या या कौशल्यामुळे त्यांना ‘फाईंग फिश’ असे नाव पडले. पंख असलेल्या या माशांना कुतूहलापोटी या दोन मच्छीमारांनी किना-यावर आणले होते. पण पर्यटकांच्या सांगण्यावरून या माशांना पुन्हा समुद्रात सोडून दिले. असगोली येथे दोन मच्छीमार समुद्रात मासेमारी करायला गेले असताना त्यांना फाईंग फिश सापडले होते. फ्लाईंग फिश या माशाच्या जवळपास ४० हून अधिक प्रजाती आहेत. या माशांचे पर मोठे असतात. त्याचा ते पंखासारखा वापर करतात. हे मासे जितक्या सहजपणे पाण्यात पोहू शकतात तितक्याच सहजपणे ते पाण्याच्या बाहेरही उडू शकतात. साधरण एक फूट लांबीचे हे मासे असून हवेत चार फूटांपर्यंत ते झेप घेऊ शकतात. अटलांटिक, प्रशांत आणि हिंदी महासागरात हे मासे प्रामुख्याने आढळतात. खोल समुद्रात हे मासे आढळत असून किना-यावर ते क्वचितच पाहायला मिळतात.