विश्वासार्हतेचं दुसरं नाव म्हणजे टाटा असं म्हटलं जातं. कंपनीचे सर्वोसर्वा रतन टाटा हे तर जगभरामध्ये त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. रतन टाटा यांनी कालच म्हणजेच २८ डिसेंबर २०२१ रोजी आपला ८४ वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा वाढदिवस साजरा करताना एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
या व्हिडीओमध्ये रतन टाटा एका खुर्चीवर बसले असून ते समोरच्या टेबलवरील छोटा कप केक कापताना दिसत आहेत. छोट्या केकवर लावलेल्या मेणबत्तीला फुंकर मारून नंतर रतन टाटा हा केक कापतात. त्यानंतर समोरच्या टेबलजवळ बसलेला तरुण रतन टाटांच्या बाजूला येऊन उभा रातो आणि त्यांच्या खांद्यावरुन मायेनं हात ठेवतो. नंतर तो खाली बसतो आणि कापलेल्या कप केकचा एक तुकडा रतन टाटांना भरवतो.
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. पण या व्हिडीओत अगदी प्रेमाने रतन टाटांना केक भरवणारा हा तरुण आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडलाय. तर हा तरुण ३० वर्षांचा आहे. विशेष म्हणजे हा रतन टाटा यांचा कोणी नातेवाईक नाहीय असं तुम्हाला सांगितल्यास आश्चर्य वाटेल. पण मग हा तरुण आहे तरी कोण त्याच्यासोबत रतन टाटांनी वाढदिवस साजरा केला, असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. या तरुणाचं रतन टाटांसोबत खास कनेक्शन आहे. याच कनेक्शनबद्दल आपण या लेखातून जाणून घेऊयात.
नक्की वाचा >> रतन टाटांची एकूण संपत्ती आहे तरी किती?
तर व्हायरल व्हिडीओमध्ये रतन टाटांच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या, त्यांना केक भरवणाऱ्या तरुणाचं नाव आहे, शंतनू नायडू. शंतनू हा रतन टाटांचा पर्सनल सेक्रेट्री आहे. तसे रतन टाटा हे तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. त्यांची भाषणे, किस्से सोशल नेटवर्किंगवर कायम व्हायरल होत असतात. मात्र खूपच कमी लोकांना ठाऊक असेल की ८५ व्या वर्षात पदार्पण रतन टाटांचा पर्सनल सेक्रेट्री म्हणून काम करणारा मुलगा ३० वर्षांचा आहे. इतकच नाही तर या तरुणाला खुद्द रतन टाटा यांनीच फोन करुन, “तू माझ्याबरोबर काम करणार का? अशी विचारणा केली होती. हो तुम्हाला हे खरं वाटणार नाही पण खरोखरच टाटांनी शंतनू नायडू या तरुणाला फोन करुन स्वत: कामाची ऑफर दिली. यासंदर्भातील शंतनूचा प्रवास सांगणारी एक पोस्ट काही वर्षापूर्वी ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ने शेअर केली होती.
‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ हे पेज फेसबुकवर प्रचंड लोकप्रिय पेजेसपैकी एक आहे. या पेजवर सामान्यातील असामान्य व्यक्तींच्या कथा अगदी रंजक पद्धतीने सांगितल्या जातात. याच पेजवरुन शंतनूची कहाणी पोस्ट करण्यात आली आणि पाहता पाहता ती व्हायरल झाली होती. यामध्ये त्याने आपली रतन टाटांशी भेट कशी झाली आणि नक्की तो काय करतो याबद्दलची माहिती दिलीय.
नक्की पाहा हे फोटो >> Photos : रतन टाटा म्हणजे माणसातला देव… करोना काळातील मदतीसाठी नेटकऱ्यांकडून टाटांना साष्टांग नमस्कार
पहिली भेट नेमकी कशी घडली?
रतन टाटांशी भेट कशी झाली याबद्दल बोलताना शंतनू या सर्वांची सुरुवात कुत्र्यांबद्दल असणाऱ्या प्रेमामुळे झाल्याचं सांगितलं. “मी २०१४ मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टाटा ग्रुपमध्ये काम करु लागलो. सगळं काही छान सुरु होतं. मात्र एक दिवस अचानक ऑफिसमधून घरी जाताना मला एका कुत्र्याचा मृतदेह रस्त्याच्या मधोमध पडलेला दिसता. मला कुत्र्यांची खूप आवड आहे. मी अनेकदा कुत्र्यांना वाचवलंही होतं. त्यामुळे तो मृतदेह पाहून मला खूप दु:ख झालं. मी तो मृतदेह रस्त्यावरुन बाजूला घेण्याचा विचार करत होतो आणि तितक्यात एक गाडी त्या मृतदेहाला चिरडून निघून गेली त्यावेळी मला अगदी कसंतरी वाटलं. मला याबद्दल काहीतरी करावं लागेल याची जाणीव झाली. त्यामुळे मी माझ्या काही मित्रांना फोन केला आणि ‘कॉलर रिफलेक्टर’ तयार केला. त्यामुळे हे रिफलेक्टर गळ्यात असणारे कुत्रे वाहन चालकांना खूप लांबूनही दिसतील. हे रिफलेक्टर काम करेल की नाही मला ठाऊक नव्हतं. मात्र दुसऱ्याच दिवशी मला फोन आला आणि या कॉलरमुळे एका कुत्र्याचा जीव वाचल्याचे मला समोरच्याने सांगितले. तेव्हा मला खूप आनंद झाला.माझ्या कामाची खूप चर्चा झाली आणि टाटा ग्रुपच्या कंपन्यांच्या वृत्तपत्राने माझ्या कामाची दखल घेतली. अनेकांना या रिफलेक्टर कॉलर विकत घ्यायच्या होत्या मात्र आमच्याकडे त्या तयार करण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी माझ्या वडिलांनी मला एक सल्ला दिला. टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनाही कुत्र्यांबद्दल भरपूर प्रेम आहे त्यांना तू पत्र लिहून याबद्दल कळव असं मला वडिलांनी सुचवलं,” असं शंतनुने सांगितलं.
नक्की वाचा >> २६/११ मुंबई हल्ला : दहशतवादी हल्ला सुरु असतानाही रतन टाटांना करायचा होता ‘ताज’मध्ये प्रवेश, पण…
त्याने अखेर पत्र लिहिलं अन्…
“वडीलांनी सुचवलेल्या कल्पनेला आधी मी नकार दिला. नंतर मात्र मी स्वत:च्या अक्षरात एक पत्र लिहून रतन टाटा यांना पाठवले. काही दिवसांनी मी त्या पत्राबद्दल विसरूनही गेलो. मात्र त्यानंतर काही दिवसांनी मुंबईमधील ऑफिसमध्ये ते मला भेटले आणि “तुझ्या कामाने मी प्रभावित झालो आहे” असं सांगितलं. आजही तो प्रसंग सांगताना माझ्या अंगावर काटा येतो. त्यानंतर ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले आणि आमच्या मैत्रीला सुरुवात झाली. अर्थात नंतर त्यांनी आमच्या रिफेलक्टर कॉलरच्या मोहिमेला आर्थिक मदत केली,” असं शंतनूने सांगितले.
टाटांना दिलेलं आश्वासन…
मात्र टाटा यांच्याशी ओळख झाल्यानंतर अचानक शंतनूने नोकरी सोडून परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यावेळी त्याने रतन टाटांना एक आश्वासन दिलं. याबद्दल बोलताना शंतनूने, “मी शिक्षणासाठी परदेशात गेलो. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी माझं संपूर्ण आयुष्य टाटा ट्रस्टमध्ये काम करण्यासाठी देईन असं आश्वासन मी रतन टाटांना दिलं. त्यांनी मला हसत हसत होकार दिला,” अशी आठवण सांगितली..
आणि तो कॉल आला…रतन टाटा यांनी समोरुन कॉल करुन मला असिस्टंट होण्याची ऑफर दिल्याचंही शंतनूने सांगितलं. “मी शिक्षण पूर्ण करुन जेव्हा भारतात परत आलो तेव्हा त्यांनी मला फोन केला. “माझ्या ऑफिसमध्ये करण्यासारखं बरचं काम आहे. तू माझा असिस्टंट होशील का?,” असं त्यांनी मला विचारलं. काय बोलू मला समजत नव्हतं. मी एक मोठा श्वास घेतला आणि ‘हो’ असं उत्तर दिलं,” हे सांगताना शंतनूच्या चेहऱ्यावर आपसूकच हसू आलं.
नक्की पाहा हे फोटो >> महिलांचे कपडे, खेळणी, टॅक्सी, फर्निचर, गाड्या, इंधन अन्… रतन टाटांनी गुंतवणूक केलेल्या Startups ची थक्क करणारी यादी
रतन टाटा बॉस नाही तर…
“मी मागील १८ महिन्यांपासून त्यांच्याबरोबर काम करत आहे. मात्र आजही अनेकदा मी स्वत:ला चिमटा काढून हे स्वप्न तर नाही ना याची खात्री करुन घेतो. चांगला मित्र, चांगला मार्गदर्शक आणि चांगला बॉस मिळावा म्हणून माझ्या वयाचे तरुण झगताना दिसतात. अशावेळी माझा माझ्या नशिबावर विश्वास बसत नाही हे सारं मला रतन टाटा नावाच्या एका सुपर ह्युमनमध्ये मिळालं आहे. लोकं त्यांना बॉस म्हणतात पण मी त्यांना मिलेनियल डंबलडोर असं म्हणतो. हे नाव त्यांना अगदी योग्य वाटतं,” असंही शंतनूने ह्युमन्स ऑफ बॉम्बेशी दोन वर्षांपूर्वीच्या मुलाखतीमध्ये बोलताना सांगितलं होतं.
टाटांचा महत्वाचा सल्लागार
‘युआर स्टोरी’ या वेबसाईटवरील वृत्तानुसार आज शंतनू रतन टाटांबरोबर अनेक ठिकाणी फिरतो. अनेकदा नवीन स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात सल्ले रतन टाटा शंतनूकडून घेतात.