उद्योपती रतन टाटा यांनी नुकतंच वयाच्या ८४ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातू नवल टाटा यांचे पुत्र आहेत. जे.आर.डी. टाटा हे ‘टाटा सन्स’च्या चेअरमन पदावरून १९९१ साली निवृत्त झाले. त्यानंतर कंपनीच्या चेअरमनपदाची जबाबदारी रतन टाटा यांच्या खांद्यावर आली. यानंतर टाटा सन्सने प्रगतीची अनेक शिखरं गाठली. त्याला रतन टाटांची मेहनतच कारणीभूत आहे. रतन टाटांच्या नेतृत्वाखाली टाटाने अन्य कित्येक कंपन्यांना आपल्या ताब्यात घेतल्या. ‘टाटा टी’ या कंपनीने टेटले कंपनीला, ‘टाटा मोटर्स’ने जॅग्वार लँड रोव्हरला , आणि ‘टाटा स्टील’ने कोरस कंपनीला आपल्या ताब्यात घेतले आहे. २००४ साली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला शेअर बाजारात लिस्ट करण्यात आले.
यशस्वी उद्योजक, दूरदृष्टी व्यक्ती, देशभक्त आणि सामान्यांप्रती आदर असणारी व्यक्ती म्हणून रतन टाटा यांची ओळख आहे. २८ डिसेंबर रोजी त्यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला. त्यांनी छोटा केकवर लावलेल्या मेणबत्तीला फुंकर मारून आपला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी साधेपणाने साजरा केलेल्या वाढदिवस व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रतन टाटा यांनी १९९९ मध्ये त्यांची ड्रीम कार टाटा इंडिका लॉन्च केली. ही कार लॉन्च झाल्यापासून त्यात अनेक समस्या येऊ लागल्या. गाड्या जलमय रस्त्यांवर मध्येच थांबायच्या. त्यामुळे या हॅचबॅक कारला चांगलाच फटका बसला. आपल्या ड्रीम कारची ही अवस्था पाहून रतन टाटा खूप दुःखी झाले आणि त्यांनी टाटा मोटर्सचा कार व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अमेरिकन ऑटोमेकर फोर्डने टाटांच्या कार व्यवसायात रस दाखवला आणि करारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी रतन टाटा यांना अमेरिकेत येण्याचे आमंत्रण पाठवले. फोर्डसोबत करार करण्यासाठी रतन टाटा अमेरिकेतील फोर्ट मोटरच्या मुख्य कार्यालयात पोहोचले. जिथे त्यांच्यासोबत कंपनीचे भागधारकही होते. रतन टाटा यांची फोर्ड कंपनीसोबतची बैठक सुमारे ३ तास चालली. या भेटीत फोर्डचे चेअरमन यांनी रतन टाटा यांना अपमानस्पद म्हणाले की, “तुम्हाला कार व्यवसायाची काहीच कल्पना नव्हती, तर तुम्ही ही कार लॉन्च करण्यासाठी इतका पैसा का खर्च केला? आमची फोर्ड कंपनी तुमची कंपनी विकत घेऊन तुमच्यावर उपकार करत आहोत. रतन टाटा यांना फोर्डच्या अधिकाऱ्याच्या बोलण्याने वाईट वाटले आणि ते बैठक सोडून भारतात परतले. या बैठकीनंतर रतन टाटा यांनी टाटा मोटर्स विकण्याचा निर्णय मनातून काढून घेतला आणि पुन्हा एकदा कठोर परिश्रम करण्याचा निर्णय घेतला आणि यश संपादन केले. २००८ च्या जागतिक मंदीमुळे फोर्ड कंपनी तोट्यात जाऊन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली. अशा परिस्थितीत रतन टाटा यांनी फोर्डची लँड रोव्हर आणि जग्वार खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला. तब्बल ८ वर्षांनंतर रतन टाटा यांनी याच कंपनीचे स्टेक विकत घेतले. त्यानंतर फोर्ड चेअरमन बिल बोर्ड यांनी रतन टाटा यांचे आभार मानले.