Garba stopped in between to pay tribute to the Ratan Tata: भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील प्रतिष्ठित उद्योगपती रतन टाटांचे मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात बुधवारी, ९ सप्टेंबर रोजी रात्री निधन झाले. रतन टाटांनी आपल्या दूरदर्शी नेतृत्वासह देशातील सर्वात जुन्या औद्योगिक घराण्यांपैकी एक टाटा समूहाला मोठ्या उंचीवर नेले. रतन टाटा गेल्याची बातमी समोर आली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. दरम्यान, मुंबईतील गोरेगाव येथील गरब्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या ठिकाणी रतन टाटा यांच्या निधनाची बातमी मिळताच गरबा थांबवण्यात आला आणि मुंबईच्या गरब्यातील सळसळती पावलंही रतन टाटांसाठी थबकली. रतन टाटांना सर्व तरुणाईने श्रद्धांजली वाहिली. या व्हिडीओचं सर्वत्र कौतुक होत असून रतन टाटांनी लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं होतं, याची प्रचिती यावेळी आली.
रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. द्रष्टा, दानशूर, दयाळू, दिलदार, देशप्रमी, नफा-तोटा न पाहणारा उद्योगपती म्हणून रतन टाटा यांची ओळख होती; त्यामुळे रतन टाटा यांच्या निधनानं देशाची मोठी हानी झाली आहे. औद्योगिक क्षेत्रात मोठं योगदान देणारं, देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. रतन टाटा यांच्याबद्दल देशातील जनतेला वेगळीच आपुलकी होती, हे या व्हिडीओतून समोर आलं.
निधनाची बातमी ऐकताच मुंबईकरांनी अक्षरश: हात जोडले
नवरात्रीच्या निमित्तानं देशभरात अनेक गरबा इव्हेंट आयोजित केले जात आहेत. पण, लक्षवेधी बाब म्हणजे टाटांच्या निधनाची बातमी मिळताच हे सर्व कार्यक्रम एका क्षणात थांबवण्यात आले. लोकांनी शांतपणे उभं राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को येथेही गरबा सुरू असताना टाटांच्या निधनाची बातमी मिळताच गाणी आणि गरबा थांबवून सर्व मुंबईकरांनी रतन टाटा यांना हात जोडून श्रद्धांजली वाहिली. हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत. खरं तर जगात उद्योजकांची काहीच कमतरता नाही. एका पेक्षा एक श्रीमंत लोक आपल्या देशातही आहेत, पण रतन टाटांबाबत लोकांच्या मनात एक वेगळंच प्रेम होतं. अगदी सामान्यातला सामान्य माणूससुद्धा रतन टाटांबद्दल आदर व्यक्त करतो, यावरून त्यांचा करिष्मा आपल्या लक्षात येतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Ratan Tata Death: “घड्याळाची टिकटीक थांबली…” हर्ष गोयंका यांची मन हेलावणारी पोस्ट; पिचाई म्हणाले, ‘भारताला…’
सोशल मीडियावर sangha_3588 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलंय, एक चांगली व्यक्तीच दुसऱ्या चांगल्या व्यक्तीचा आदर करू शकते, तर कोणी म्हणतंय, रतन टाटा कायमच आपल्या हृदयात राहतील.