टाटा उद्योग समूहाचा देशाच्या प्रगतीत मोठा वाटा आहे. देशातलं सर्वात मोठं औद्योगिक घराणं म्हणून ‘टाटां’कडे पाहिलं जातं. रतन टाटा हे या समुहाचे प्रमुख आहेत. रतन टाटा यांचं वय ८० पेक्षा जास्त असलं तरीही त्यांच्याबाबत तरुणांना प्रचंड आकर्षण आहे. माणुसकी जपणं, आपुलकी जपणं हे त्यांच्या स्वभावविशेष तरुणांना काय सगळ्यांनाच भावतात. आजारी कर्मचाऱ्याची विचारपूस करणं असो किंवा कर्मचाऱ्यांना इतर मदत करणं असो रतन टाटा हे आदर्श मानले जातात. त्यांच्या माणुसकीचं आणि नम्रतेचं दर्शन याआधीही झालं आहे. सध्या त्यांनी केलेली एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टमधून त्यांच्या माणुसकीचं दर्शन पुन्हा एकदा घडलं आहे.
रतन टाटांची पोस्ट काय?
रतन टाटा हे श्वानप्रेमी म्हणूनही ओळखले जातात. रतन टाटांकडे विविध जातींचे श्वान आहेत. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांविषयी त्यांना वाटणारी आत्मियता याआधीही व्यक्त झाली आहे. अशात त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी जो फोटो शेअर केला आहे तो एका श्वानाचा असून तो हरवला असून माझ्या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना सापडला आहे त्याच्या मालकाने त्याला घेऊन जावं असं नम्र आवाहन त्यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमधून केलं आहे. मुंबईतल्या टाटा समूहाच्या मुख्यालयात जिथे टाटा यांच्याकडचे श्वान आहेत तिथेच सध्या या सापडलेल्या श्वानाला ठेवण्यात आलं आहे.
काय म्हटलं आहे रतन टाटांनी?
हा कुत्रा माझ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना मुंबईतल्या सायन रुग्णालयाजवळ सापडला. तुम्ही जर कुत्र्याचे मालक असाल किंवा तुम्हाला याविषयी काही माहिती असेल तर ती शेअर करा. त्यासाठी एक इमेल आयडीही देत आहे असं सांगत रतन टाटांनी ही पोस्ट शेअर केली आहे. जी चांगलीच व्हायरल झाली आहे.
भटक्या कुत्र्यांविषयी रतन टाटांच्या मनात कणव आहे. तसंच त्यांचं श्वानप्रेम हेदेखील जगजाहीर आहे. भटक्या कुत्र्यांविषयी ज्या संस्था काम करतात त्यांनाही ते आर्थिक सहकार्य करतात. आता त्यांनी मुंबईतल्या सायन रुग्णालयाजवळ सापडलेल्या कुत्र्यासाठी आवाहन केलं आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यातल्या माणुसकीचं दर्शन घडलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.