Ratan Tata Passed Away : देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे काल दि.९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. एक उद्योजक गेल्यावर संपुर्ण देशभर होणारी हळहळ सर्वत्र दिसत आहे. तुम्ही गेलात आणि जाताना आम्हाला जगण्याचं सार शिकवून गेलात असे आज प्रत्येक जण म्हणत आहे. दरम्यान रतन टाटांच्या निधनाचं वृत्त प्रसिद्ध होताच अनेक नेत्यांनी, कलाकारांनी आणि उद्योगपतींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनामुळे जगभरातून शोक व्यक्त होत असतानाच भारतीय उद्योग जगताकडूनही रतन टाटांच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंकांबरोबरच अनेकांनी रतन टाटांना भावनिक शब्दांमध्ये श्रद्धांजली वाहिली आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष सुंदर पिचाई यांनीही सोशल मीडियावरुन रतन टाटांबरोबरच्या शेवटच्या भेटीच्या आठवणी जागवल्यात.

Ratan Tata Death: हर्ष गोयंका यांनी वाहिली श्रद्धांजली म्हणाले “घड्याळाची टिकटीक थांबली…”

उद्योजक हर्ष गोयंका यांनीही सोशल मीडियावरुन रतन टाटांना आदरांजली वाहिली आहे. “घड्याळाची टिकटीक थांबली आहे कारण टायटन शक्तीशाली व्यक्ती आपल्याला सोडून गेलाय. रतन टाटा हे प्रामाणिकपणा, योग्य नेतृत्व आणि दातृत्वाची मशाल असल्याप्रमाणे होते. त्यांनी त्यांच्या कामगिरीने उद्योगजगतावर कायमचा ठसा उमटवला. त्यांनी इतर क्षेत्रांमध्येही आपल्या कामाची छाप सोडली. ते कायमच आमच्या आठवणींमध्ये राहतील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो,” असं हर्ष गोयंका यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा >> Ratan Tata: “ज्या दिवशी मी स्वत: काही करू शकणार नाही…”, रतन टाटांचे नव्या पिढीला प्रेरणा देणारे अजरामर शब्द!

Ratan Tata Death: सुंदर पिचाई म्हणाले, ते भारताला उत्तम बनवण्यासाठी झटले

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनीही सोशल मीडियावरुन रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “माझी रतन टाटांबरोबरची शेवटची भेट ही गुगलमध्ये झाली होती. आम्ही वेमोच्या प्रगतीबद्दल बोललो होतो. त्यांच्याकडून या विषयावर ऐकणं फारच प्रेरणादायी होतं. त्यांनी आपल्या मागे फारच असमान्य उद्योग व्यवसाय आणि सामजसेवेचा वास सोडला आहे. ते भारतील उद्योगजगतामध्ये आधुनिक नेतृत्व तयार व्हावं यासाठी सक्रीय होते. भारताला अधिक उत्तम बनवण्यासाठी ते फार धडपडायचे. रतन टाटांच्या आत्म्यास शांती मिळो,” असं पिचाई यांनी म्हटलं आहे.

केवळ उद्योगच नव्हे तर रतन टाटा हे त्यांच्या परोपकारी कार्यासाठीही जगभर प्रसिद्ध आहेत. दरवर्षी ते आपल्या कमाईतील मोठा हिस्सा धर्मादाय कार्यात खर्च करतात.