टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा हे त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर काही हटके पोस्ट शेअर करण्यासाठी नेटीझन्समध्ये ओळखले जातात. अगदी प्राण्यांना दत्तक घेण्यापासून ते जुन्या फोटोंपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी रतन टाटा आपल्या फॉलोअर्ससाठी शेअर करत असतात आणि त्यावर नेटीझन्स भरभरुन व्यक्त होतात. मंगळवारी सायंकाळी रतन टाटांनी अशीच एक पोस्ट केलीय. टाटा सन्सचे अध्यक्ष असणाऱ्या रतन टाटा यांनी आपल्याला पियानो शिकण्याची इच्छा असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी टाटांनी व्यक्त केलेली ही इच्छा वाचून अनेकजण नव्याने त्यांच्या प्रेमात पडल्याचं पोस्ट खालील कमेंटमधून दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की पाहा >> महिलांचे कपडे, खेळणी, टॅक्सी, फर्निचर, गाड्या, इंधन अन्… रतन टाटांनी गुंतवणूक केलेल्या Startups मध्ये मराठमोळ्या मुलीच्या कंपनीचाही समावेश

आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये रतन टाटा यांनी पियानोसंदर्भात बोलताना आपल्याला तो शिकण्याची इच्छा आजही कायम असल्याचं म्हटलं आहे. लवकरच मी पियानो वाजवण्यास शिकेन असा विश्वासही त्यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केलाय. “मी लहान असताना थोड्याफार प्रमाणात पियानो शिकलो होतो. मात्र आजही छान पद्धीने पियानो वाजवण्यास शिकण्याच्या इच्छेने मी मोहित होतो,” असं रतन टाटांनी पोस्टमध्ये म्हटलंय. “निवृत्त झाल्यानंतर मी एक छान पियानो शिकवणारे शिक्षक शोधले होते. मात्र दोन्ही हाताने पियानो वाजवण्यास शिकण्यासाठी आवश्यक असणारं लक्ष (आणि वेळ) देणं मला जमलं नाही. लवकरच मी पुन्हा एकदा पियानो शिकण्याचा प्रयत्न करेन,” असंही टाटांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आपल्या या भावना व्यक्त करताना टाटांनी पियानो वाजवतानाचा स्वत:चा एक फोटो पोस्ट केलाय.

फोटो पोस्ट केल्यानंतर १४ तासांमध्ये फोटोला ९ लाख ५० हजारांहून अधिक लाइक्स मिळालेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट करुन या वयामध्ये टाटांनी पियानो शिकण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दल त्याचं कौतुक केलं आहे. इतकच नाही तर अनेकांनी तुमची ही पियानो शिकण्याची इच्छा लवकरच पूर्ण होवो अशा शुभेच्छा दिल्यात. तसेच काहींनी एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्ती इतक्या नम्रपणे आपल्याला न जमलेल्या गोष्टीबद्दल इतक्या साध्या शब्दांमध्ये व्यक्त झाल्याचं पाहून आश्चर्य वाटल्याचं म्हटलं आहे. तर काहींना रतन टाटा यांना थोड्याफार प्रमाणात का असेना पियानो वाजवता येतो हे जाणून आश्चर्य वाटलं आहे. एका युझरने सर खरोखर तुम्ही फार वेगळे आहात असं म्हटलंय तर एकाने तुम्हाला अनेक गोष्टी येतात असं म्हणतं टाटांचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratan tata posts about learning to play the piano netizens love it scsg