देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी सोमवारी अफगाण क्रिकेटपटू राशिद खानला आर्थिक बक्षीस देऊ केल्याच्या त्यांच्या नावावर करण्यात येत असलेल्या दाव्याचे खंडन केले. रतन टाटांनी अधिकृत X हँडलवर एक निवेदन जारी करत ही माहिती दिली.
रतन टाटा यांनी लिहिले की, “मी कधीही आयसीसी किंवा कोणत्याही क्रिकेट फॅकल्टीला कोणत्याही खेळाडूला दंड किंवा बक्षीस देण्याबाबत कोणतीही सूचना दिलेली नाही. माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही. व्हॉट्सअॅप फॉरवर्ड आणि व्हिडिओ माझ्या अधिकृत प्लॅटफॉर्म खात्यावरून पोस्ट केल्याशिवाय त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या अशा खोटारड्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असे त्यांनी स्पष्टच सांगितले.
गेल्या अनेक दिवसापासून सोशल मिडीयावर रतन टाटा यांची एक फेक न्यूज मोठ्या प्रमाणत व्हायरल होत होती. टाटांनी अफगाणिस्तानच्या खेळाडूला मदत केल्याचा दावा अनेक यूजर्सनी सोशल मीडियावर केला होता. रतन टाटा यांनी क्रिकेटर राशीद खानला दहा कोटी रुपये दिल्याचा असा दावा केला जात होता आणि ही माहिती सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आली. आता याच माहितीचे रतन टाटा यांनी खंडन केलं आहे.
(हे ही वाचा : VIDEO: लग्नाळू पोरांना एमएस धोनीचा विचित्र सल्ला, म्हणाला, “मेरी वाली अलग है…” )
राशिद खान हा अफगाणिस्तान क्रिकेट संघाकडून खेळतो. सध्या सुरू असलेल्या विश्वचषक (वर्ल्ड कप २०२३) मध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानी संघाविरुद्ध शानदार विजय मिळवला आणि यामध्ये राशिद खानने गोलंदाजी करत चांगली कामगिरी केली होती. तोच राशिद खान खांद्यावर देशाचा झेंडा घेऊन पाकिस्तानवरील विजयाचा आनंद साजरा करताना दिसला. तेव्हापासून रतन टाटा यांच्याशी संबंधित या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या.
तर दुसरीकडे, अशाही अफवा आहेत की, पाकिस्तानी संघाविरुद्धच्या विजयादरम्यान राशिद खानने भारतीय ध्वज घेऊन आनंदोत्सव साजरा केला होता. यासाठी आयसीसीने राशिद खानवर ५५ लाखांचा दंडही ठोठावला होता. या वृत्तालाही अद्याप दुजोरा मिळालेला नाही.