एखादा अटीतटीचा सामना पाहताना अचानक लघुशंका येते. मग मध्येच सामना सुरु असताना निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी सामना आहे, तिथे सोडून प्रसाधनगृहाकडे पळावे लागते. जागेवरून उठून लघूशंकेला गेलं की बरोबर सामन्यामध्ये काहीतरी महत्वाचं घडतं आणि सामन्याला कलाटणी देणारा तो क्षण पाहण्यास आपण मुकतो. बरं सामना घरी टिव्हीवर पाहत असलो तरी किंवा अगदी मैदानात पाहत असलो तरी हे असंच होतं. मात्र आता रिअल माद्रिद या जगप्रसिद्ध फुटबॉल क्लबने आपल्या चाहत्यांची या ‘अवघड’ परिस्थितीमधून सुटका करण्यासाठी एक भन्नाट कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. रिअल माद्रिदचे होम ग्राऊण्ट असणाऱ्या सॅंटियागो बर्नाबे स्टेडियममध्ये चक्क प्रसाधनगृहामधील प्रत्येक युरिनलसमोर स्क्रीन लावली असून या स्क्रीनवर लघुशंका करतानाही मैदानात सुरु असणारा सामना लाइव्ह पाहता येणार आहे. त्यामुळे सामन्याचा प्रत्येक सेकंद चाहत्यांना अगदी प्रसाधनगृहातही पाहता येईल.

सध्या नेटकऱ्यांमध्ये खरोखर या गोष्टीची गरज आहे का यावरून दुमत आहे. मात्र या अनोख्या प्रसाधनगृहाचे व्हिडीओ युट्यूबवर चांगलेच व्हायरल झाले असून अनेकांना ही कल्पना आवडली आहे तर काहींनी याची गरज नव्हती असे मत व्यक्त केले आहे.

या प्रसाधनगृहावरून फुटबॉल चाहत्यांमध्ये मतभेद असले तरी अशाप्रकारे प्रसाधनगृहामध्ये स्क्रीन लावणारे रिअल माद्रिद हे काही पहिले फुटबॉल क्लब नाही. ला लिगा स्पर्धा खेळणाऱ्या लेग्युन्सनेही (Legunes) आपले होम ग्राऊण्ड असणाऱ्या बुटरक येथील स्टेडियममध्ये याआधीच असा प्रयोग केला आहे.

रिअल माद्रिद सध्या सँटियागो बर्नाबे स्टेडियमचा कायापालट करत आहे. एकूण ५० कोटी पाऊण्ड खर्च करुन या स्टेडियमला नवीन रुप देण्यात येणार आहे. सध्या चर्चेत स्क्रीनसहीतची प्रसाधनगृहे ही याच डागडुजीदरम्यान बांधण्यात आली आहे. क्लब या स्टेडियममध्ये दोन मोठे टॉवर तसेच एक ३६० अंशाचा व्ह्यू देणारी स्क्रीन बांधणार असल्याचेही समजते. त्यामुळे आता ज्याप्रमाणे स्क्रीनवाल्या प्रसाधनगृहांची भन्नाट कल्पना क्लबने प्रत्यक्षात आणली तसेच आणखीन कोणत्या कल्पना या स्टेडियमची डागडुजी करताना वापरण्यात येणार आहेत याकडे केवळ रिअल माद्रिदच नाही तर सर्वच फुटबॉल प्रेमींचे लक्ष लागलेले आहे.