Medical Store Viral Video : देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतयं. अशा परिस्थितीत अनेक तरुण करिअरच्या अनेक संधी मिळू शकतात असे क्षेत्र निवडताना दिसतात. यातही अनेकांचा वैद्यकीय क्षेत्राकडे कल असतो, कारण यात फक्त डॉक्टरच नाही तर करियरच्या अनेक संधी मिळतात. जे तरुण NEET UG उत्तीर्ण होऊ न शकल्यामुळे MBBS, BDS किंवा BHMS सारख्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकत नाहीत, ते फार्मसी निवडून बी. फार्मा आणि डी. फार्मा कोर्सेस करतात; यातून अनके जण मेडिकल व्यवसाय सुरू करतात. पण, या मेडिकल व्यवसायातही आता बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसतेय. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ज्यात बी-फार्मा आणि बी-फार्मावाल्यांची सध्या काय परिस्थिती आहे हे दिसून येतेय. तुम्ही भाजी मार्केटमध्ये पाहिलं असेल की, भाजी विक्रेते ग्राहकांना जोरजोरात हाक मारून बोलवत आपला भाजीपाला विकताना दिसतात. पण, भारतातील एका ठिकाणी मेडिकल व्यावसायिक औषधं चक्क लोकांना हाक मारून बोलवत विकताना दिसतायत. यामुळे व्हिडीओ पाहणाऱ्यांनाही प्रश्न पडलाय की, हे लोक औषधं विकतायत की भाजी.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्याकडेला एका बाजूला एक अशी चार औषधांची दुकानं आहेत. प्रत्येक औषधांच्या दुकानावर मोठ्या अक्षरात दुकानाचं नाव आणि वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. या प्रत्येक दुकानात चार ते पाच लोक रस्त्यावरून येणाऱ्या- जाणाऱ्यांना हाक मारत बोलावून औषधं विकताना दिसतायत. मेडिकल दुकानाच्या दिशेने येणाऱ्या प्रत्येकाला ते ओ दादा, ओ काका अशी हाक मारत आपल्या दुकानात बोलवताना दिसत आहेत. आपल्या दुकानातील औषधं विकण्यासाठी मेडिकल दुकानदारांची चाललेली ही चढाओढ पाहून प्रश्न पडतो की, त्यांच्यावर ही वेळ कशामुळे आली आहे.
- मेडिकल दुकानदारांवर ही वेळ कशामुळे आली आहे?
कारण तुमच्यापैकी अनेकांचा असा समज होता की, मेडिकल स्टोअर हा कधीही न बंद होणारा आणि कमाईसाठी सर्वात चांगला व्यवसाय आहे; कारण ज्याप्रमाणे लोकांना आजारपणानंतर रुग्णालयात जाण्याची गरज भासते, अगदी त्याचप्रकारे औषधांचीही गरज भासते. त्यामुळे मेडिकल स्टोअर हा एकमेव व्यवसाय आहे, जिथे कमाईची अधिक संधी असते असे लोकांना वाटते. मात्र, या व्हिडीओतून तुम्हाला मेडिकल दुकानदारांची आता काय परिस्थिती आहे हे दिसून येते. यातून आता फार्मसी क्षेत्रातही कशी बेरोजगारीची स्थिती निर्माण झाली आहे याचे भीषण वास्तव दिसतेय. पण, हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरणे अवघड झाले आहे.
लैंगिक संबंधांमुळे खरंच चांगली झोप लागते का? यावर डॉक्टरांचे काय मत आहे? जाणून घेऊ…
nk_writers907 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यावर अनेक जण वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, हे औषधं विकतायत की भाजी. दुसऱ्या युजरने लिहिले की, यातील कोणी डी फार्मा, बी फार्मा केलं नाही. तर अनेकांना हा व्हिडीओ पाहून हसू आवरणे अवघड झाले आहे.