रिमा लागू यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली. रिमा यांच्या जाण्याने हिंदी सिनेसृष्टीने फक्त गुणी आईच गमावली असे नाही तर मालिका, रंगभूमीने एक चतुरस्र अभिनेत्रीही गमावली. गुरूवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रिमा यांचे निधन झाले. कला, राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असताना अमुलनेही त्यांच्या अनोख्या पद्धतीने रिमा लागू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हिंदी सिनेसृष्टीची आवडती आई अशी रिमा यांची ओळख आहे. रिमा यांनी सिनेमांत साकारलेल्या नानाविध व्यक्तिरेखेमुळे हिंदी सिनेसृष्टीला आईचा नवा पैलू कळला. अमुलने त्यांच्या जाहिरातीमध्ये ‘तू तू मैं मैं’, ‘हम आपके हैं कौन’, ‘वास्तव’ या सिनेमांमध्ये रिमा यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. ‘वास्तव’ सिनेमात साकारल्या अफलातून व्यक्तिरेखेसाठी रिमा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
#Amul Topical: Tribute to Bollywood's much loved 'Ma' pic.twitter.com/M85t6qO9sy
— Amul.coop (@Amul_Coop) May 19, 2017
अमुलच्या जाहिराती या त्यांच्या मेसेजसाठी अधिक प्रसिद्ध असतात. ज्या पद्धतीने अमुल जाहिरातींचे मेसेज लिहितात त्या अनेकदा चर्चेचा विषयही बनतात. यावेळीही त्यांनी रिमा यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. ‘हम आपके है फॉरेव्हर…’ असा हृदयस्पर्शी मेसेज त्यांनी या जाहिरातीसाठी लिहीला.
हिंदी सिनेमांमध्ये लागू या गोविंदापासून शाहरुख खानपर्यंत सगळ्यांच्याच आई होत्या. त्यातही सलमानची आवडती आई अशी त्यांची खास ओळख होती. सलमानच्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी त्याच्या आईची भूमिका साकारली होती.
‘सगळ्यांना ती हिंदी सिनेमातली गाजलेली आई म्हणून लक्षात आहे, पण हिंदी सिनेसृष्टीत येण्याआधीही रिमाने रंगभूमीवर अफलातून काम केलं आहे. जेव्हा तिला कळलं की हिंदी सिनेमांमध्ये तिला एकाच पठडीचं काम करायला मिळत आहे तेव्हाच तिने काही तरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही तू तू मैं मैं ही विनोदी मालिका केली,’ असे सचिन पिळगांवकर यांनी सांगितले.