आतापर्यंत गोष्टींच्या पुस्तकात नाताळात सांताक्लॉज रेनडिअरच्या गाडीवरून खाऊ आणि भेटवस्तू घेऊन येतो असे वाचले असलाच. पण कदाचित जपानमध्ये या नाताळात रेनडिअरच्या गाडीवरून सांताक्लॉज नाही तर पिझ्झा डिलिव्हरी बॉय येण्याची शक्यता आहे.
डॉमिनॉज कंपनीचे काही कर्मचारी जपानमध्ये रेनडिअरला पिझ्झा डिलिव्हरी देण्याची ट्रेडिंग देत आहे. जपानच्या डॉमिनॉजने हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. थंडीचा मौसम आहे. ठिकठिकाणी बर्फ पडला आहे. अशातच घरपोच पिझ्झा पोहचवण्यास अडचण येत आहे. बर्फवृष्टीमुळे गाडीही निट चालवता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत रस्त्यावरून बर्फाचे थर हटवले जात नाही तोपर्यंत गाड्या तशाच अडकून पडत आहे. या परिस्थतीवर उपाय म्हणून डॉमिनॉजचे काही कर्मचारी रेनडिअर या प्राण्याला प्रशिक्षण देत आहेत. तसेच या प्राण्याला जर नीट प्रशिक्षण दिले तर ते अर्ध्या तासांत पिझ्झा घरपोच पोहचवतील असा विश्वास या कर्मचा-यांनी व्यक्त केला आहे.
रेनडिअर हे प्राणी बर्फाळ प्रदेशात आढळतात. अनेक गावांत वाहतूकीसाठी या प्राण्याचा उपयोग केला जातो. ते वेगाने धावू शकतात. ताशी ८० किलोमीटर इतक्या वेगाने ते पळू शकतात. त्यामुळे नाताळाच्या काळात बर्फवृष्टी झालीच तर त्यांची मदत घेऊन पिझ्झा ग्राहकांपर्यंत पोहचवण्याची अडचण दूर होईल असे या कर्मचा-यांनी सांगितले आहे.