रिलायन्सच्या बहुचर्चित जीओ फोनचं प्री-बुकिंग २४ ऑगस्ट रोजी सुरु झालं होतं. प्री-बुकिंगसाठी सुरुवातीला ५०० रुपये भरावे लागत होते. कंपनीच्या वेबसाईटसह माय जिओ अॅप आणि रिलायन्स डिजिटलच्या स्टोअर्समध्ये प्री-बुकींग करता येत होते. मात्र काही वेळातच फोनच्या बुकिंगला जास्त प्रतिसाद मिळाल्याने जिओची वेबसाईट क्रॅश झाली. त्यानंतर काही वेळाने पुन्हा वेबसाईट सुरु करण्यात आली. पण अजूनही अनेकांनी फोन बूक केलेला नाही.

त्यामुळे तुम्ही जर जिओचा फोन बुक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आता वाट पहावी लागणार आहे. जीओ सिमकार्डने टेलिकॉम क्षेत्रात धुमाकूळ घातल्यानंतर आता रिलायन्स जीओचा हा ‘स्वस्त आणि मस्त’ फोन बाजारात आला आहे. या माध्यमातून देशभरातील ५० कोटी मोबाईल फोन यूजर्सपर्यंत पोहोचण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. आठवड्याला ५० लाख फोन विकण्याचे लक्ष्य कंपनीने निश्चित केले आहे.

अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने जिओच्या वेबसाईटवरुन प्री बुकिंगचा पर्याय हटवण्यात आला आहे. ही सुविधा पुन्हा कधी सुरु होणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. सध्या या फोनचे प्री बुकिंग थांबवण्यात आले असले तरीही लवकरच ते पुन्हा सुरु कऱण्यात येईल आणि ग्राहकांना फार काळ प्रतिक्षा करावी लागणार नाही असे कंपनीचे म्हणणे आहे. फोनचे बुकींग सुरु झाल्यापासून अवघ्या काही तासांत ४० लाख ग्राहकांनी हा फोन बुक केला होता. सुरुवातीलाच इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल याची कदाचित कंपनीलाही कल्पना नव्हती. त्यामुळेच अशाप्रकारे तांत्रिक अडचण आली असावी.

या फोनसाठी दीड हजार रुपये डिपॉझिट घेण्यात येणार आहे. प्री-बुकिंगसाठी ५०० रुपये दिल्यानंतर उर्वरित हजार रुपये फोन डिलिव्हरीच्या वेळेस द्यावे लागणार आहेत. कंपनीच्या माहितीनुसार, हा फोन यूजर्सने तीन वर्षे म्हणजेच ३६ महिने वापरल्यास ते दीड हजार रुपये त्याला परत देण्यात येणार आहेत.

Story img Loader