टीआरपी मिळवण्याच्या नादात प्रसारमाध्यम कोणत्या थराला जातील ही वस्तूस्थिती दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. एका टीव्ही चॅनेलच्या कॅमेरामनने आणि काही पत्रकारांनी चक्क टीआरपी वाढवण्यासाठी आणि आपल्याला हवे असलेले फुटेज मिळवण्यासाठी एका शेतक-याला चक्क आत्महत्येचे नाटक करायला लावले. कर्नाटकमधील बेलरी गावातील एका शेतक-याने मिरचीचे पीक नष्ट झाले म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला. पाण्याच्या आभावी त्याचे शेत करपले त्यामुळे निराश झालेल्या या शेतक-याने आपले शेत तर जाळून टाकलेच पण आत्महत्येचाही प्रयत्न केला. गावातील स्थानिकांनी त्याचा जीव वाचवला ही बातमी कोणीतरी स्थानिक टीव्ही चॅनेलला दिली. बातमी समजताच काही पत्रकार आणि कॅमेरामन तिथे आले. पण या शेतक-याचे सांत्वन करण्याऐवजी यातल्या एका कॅमेरामनने त्याला कॅमेरासमोर आत्महत्येचे नाटक करायला सांगितले. इतकेच नाही तर इतर गावक-यांना देखील या नाटकात सहभागी केले. शेतक-याच्या हातात विषाची बाटली देऊन विष पिण्याचा अभिनय त्याने कॅमेरासमोर करायला लावला तर गावक-यांनी देखील त्याला वाचवण्याचा अभिनय वठवला. टीव्ही चॅनेलच्या कॅमेरामनचा चाललेला हा सारा मुर्खपणा कोणीतरी मोबाईलमध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर टाकला. सोशल मीडियावर आता याचे चांगलेच पडसाद उमटत आहेत.
Viral Video : टीआरपीसाठी काहीपण, बातमीसाठी शेतक-याला करायला लावले आत्महत्येचे नाटक
पीकाचे नुकसान झाले म्हणून या शेतक-याने शेत जाळले होते
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 17-10-2016 at 19:06 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reporters allegedly made farmer enact his own suicide