सिंगल यूज प्लॅस्टिक बंद करण्यासाठी जगभरात वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या जात आहेत. मात्र या मोहिमेला काही काळानंतर केराची टोपली दाखवली जाते. अनेकदा प्लास्टिक बंदीची घोषणा केली जाते आणि कालांतराने पुन्हा जैसे थे प्रकार असतो. यात आता नविन असं काही राहिलं नाही. मात्र हा निष्काळजीपणा भविष्यात जीवावर बेतण्याची शक्यता बळावली आहे. मानवी शरीरात तयार होणाऱ्या रक्तामध्ये प्लास्टिक मिसळत असल्याची धक्कादायक माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार असे समोर आले आहे की, प्लास्टिक हळूहळू मानवी रक्तात प्रवेश करू शकते. ८० टक्के लोकांच्या रक्तात प्लास्टिकचे छोटे कण आढळून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
डच संशोधकांच्या या अभ्यासात असे आढळून आले की, पॉलीथिलीन टेरेफ्थालेट (पीईटी) हे मानवी रक्तात आढळणारा प्लास्टिकचा सर्वात सामान्य प्रकार आहे. पीईटीचा वापर सामान्यतः पाणी, अन्न आणि कपड्यांच्या पॅकेजिंगसाठी केला जातो. ब्रिटिश दैनिक द इंडिपेंडंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, संशोधनात सहभागी लेखकांच्या मते, प्लास्टिक हवेतून तसेच खाण्यापिण्याच्या माध्यमातून मानवी शरीरात प्रवेश करू शकते. संशोधनामध्ये पॉलिप्रॉपिलीन, पॉलिस्टीरिन, पॉलिमिथाइल मेथाक्रिलेट, पॉलिथिलीन आणि पॉलीथिलीन टेरेफ्थालेट (पीईटी) यासह किमान पाच प्रकारच्या प्लास्टिकच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी २२ जणांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. संशोधकांनी सांगितले की, २२ पैकी १७ लोकांच्या रक्तात प्लास्टिकचे कण होते.
अमानुष कृत्य! भटक्या कुत्र्यांना भिंतीआड बंद केल्याचा व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडियावर संताप
संशोधनात सहभागी शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मानवी रक्तामध्ये आढळणारे प्लास्टिकचे तिसरा प्रकार म्हणजे पॉलिथिलीन. ज्याचा वापर प्लास्टिक पिशव्या बनवण्यासाठी केला जातो. तसेच बाजारात कपडे पॅकिंगसाठी केला जातो. या संशोधनाबाबत प्रोफेसर डिक वेथक यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “आमच्या रक्तामध्ये पॉलिमरचे कण आहेत. हा एक महत्त्वाचा शोध आहे.” शास्त्रज्ञ आता हे संशोधन आणखी वाढवण्याचा विचार करत आहेत.