तुमच्यापैकी अनेक जण प्रवासासाठी मेट्रोचा वापर करीत असतील. बस, लोकल ट्रेननंतर मेट्रो हे काहींसाठी प्रवासासाठीचे महत्त्वाचे साधन आहे. कमी वेळात ठरावीक ठिकाणी पोहोचण्यासाठी अनेक जण मेट्रोचा वापर करतात. या पार्श्वभूमीवर मेट्रो कॉर्पोरेशनतर्फे प्रवाशांसाठी चांगल्या नवीन सेवा सुरू करण्यात येत आहेत. त्यातच आता प्रवाशांना मेट्रोमध्ये बसूनच रेस्टॉरंटमध्ये जेवण्याचा, मित्र-मैत्रिणी, कुटुंबासह पार्टी करण्याचा आनंद लुटता येणार आहे. त्यासाठी NMRC (नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशन) एक नवीन उत्तम कल्पना आणली आहे; जी लोकांनाही खूप आवडली आहे.
नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नुकतीच मेट्रो कोच रेस्टॉरंट सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे आता खाण्या-पिण्याव्यतिरिक्त तुम्ही मेट्रोमध्ये प्रवास करताना पार्टी आणि मीटिंग्सही आयोजित करू शकता. एवढेच नाही, तर १०० हून अधिक लोकांना त्यात बसण्यासाठी उत्तम दर्जाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. NMRC ने मेट्रो कोचच्या आत एक रेस्टॉरंट तयार केले आहे; ज्याची सध्या चाचपणी केली जात आहे. उद्घाटनानंतर लगेचच हा कोच प्रवाशांच्या वापरासाठी सुरू करण्यात येणार आहे.
हे रेस्टॉरंट नोएडा सेक्टर १३७ मध्ये मेट्रो रेल्वे कोचअंतर्गत तयार केले जात आहे; ज्याच्या आत आणि बाहेरही आसन व्यवस्था करण्यात आली आहे. अहवालानुसार, २० एप्रिलपासून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणारे हे रेस्टॉरंट सकाळी ११.३० ते मध्यरात्री १२ या वेळेदरम्यान खुले असण्याची शक्यता आहे. त्याचे नऊ वर्षांचे कंत्राट एका एजन्सीला देण्यात आले आहे.