आयुष्यभर कमावलेल्या पुंजीचा उपभोघ घेण्यासाठी अनेक जोडपी जीवनाच्या उत्तरार्धात जगाची सफर करतात. पण एका जोडप्याने केवळ सफर नाही केली तर त्यांनी अनोखा विक्रम नोंदवला आहे. ६० वर्षांच्या सिल्व्हीया फोस्टर आणि त्यांचे पती ६७ वर्षांचे असलेले ब्रायन यांनी एक अतिशय आगळीवेगळी सफर केली आहे. आता त्यांनी असे काय केले ज्यामुळे त्यांच्याबाबत जोरदार चर्चा रंगल्या. तर रिटायर्ड झालेल्या या जोडप्याने १६० दिवसात २३ देश पालथे घातले आहेत.
या सफरीबाबत बोलताना ब्रायन म्हणाले, अशाप्रकारे इतक्या कमी दिवसात इतके देश फिरणे हे काही प्रमाणात थकवणारे होते. पण तरीही आम्ही खूप मज्जा केली, अनेक नवीन लोकांना भेटलो. या सफरीचे आणखी एक विशेष म्हणजे ते ज्या विमानाने सगळीकडे फिरले ते विमान ब्रायन यांनी स्वत: तयार केलेले विमान होते. हे दोघेही यु.के.तील असून ते पेशाने फार्मासिस्ट असून त्यांनी २ वर्ष खर्च करुन स्वत:चे विमान तयार केले. आम्हाला ज्याप्रकारचे विमान प्रवासासाठी हवे होते तसे मिळत नसल्याने शेवटी मी ते स्वत: तयार करायचे ठरवले. आम्ही २३ देशांबरोबरच ४३ विमानतळे पाहिली असून एकूण ३२,४२८ मैल अंतर पार केले आहे. आमच्या दोघांचाही अजून विश्वास बसत नाहीये की आम्ही इतके फिरलो आहोत असे त्या दोघांनीही सांगितले.