Rhino Attack On Tourist : जंगल सफारी करताना प्राण्यांचा मूड कसा असेल, याचा अंदाज घेणं खूपच कठीण असतं. वाघ, सिंह, बिबट्याच्या नजरेत एखादा माणूस भिडला की काही सेकंदातच होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. जंगलात छोट्या प्राण्यांना बघितल्यावर खूप जास्त भीती वाटत नाही. पण, गेंड्यासारखा प्राणी अचानक तुमच्या पाठी लागला, तर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. अशाच प्रकारचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जंगल सफारी करताना काही पर्यटक गेंड्याला पाहायला गेले अन् काही क्षणातच घडलं भयंकर..एक जीपमध्ये पर्यटक जंगलातून जात असताना अचानक दोन गेंडे गाडीच्या समोर येऊन पर्यटकांच्या नाकीनऊ आणल्याचे व्हायरल व्हिडीओत पाहू शकता. गेंड्यांना पाठलाग करताच वन विभागातील अधिकाऱ्यांनीही धूम ठोकली पण तितक्यात पर्यटकांची जीप पलटी झाली अन् पुढे जे काही घडलं ते पाहून तुम्हालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालच्या जलदापारा राष्ट्रीय उद्यानात घडली आहे.
गेंड्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याचा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे. तसंच व्हिडीओ शेअर करताना नंदा यांनी खूप महत्वाचा संदेशही दिला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय, “वाईल्ड सफारी करताना काय चुकीचं घडलं, याचं हे एक उदाहरण आहे. जंगली प्राण्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नका. स्वत:ची सुरक्षितता खूप महत्वाची आहे. दोन्ही गेंडे आणि पर्यटक सुरक्षित असल्याचं मला कळलं आहे. पण नेहमीच सर्वजण नशिबवान असू शकतात असं नाही.”
व्हिडीओत एक घनदाट जंगल दिसत आहे. त्या जंगलाच्या मधोमध एका रस्त्यातून पर्यटकांची गाडी जाताना दिसत आहे. पण त्याचदरम्यान दोन गेंडे पर्यटकांच्या जीपसमोर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असल्याचे व्हिडीओत दिसत आहेत. काही पर्यटक गेंड्यांचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न करतात. पण गेंडे पिसाळलेले असल्याने वन अधिकाऱ्यासह पर्यटकांनी धूम ठोकल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे जीप मागच्या दिशेनं चालवत असताना अचानक रस्त्याच्या बाजूला पलटी होते. तर इतर दोन वाहने गेंड्यापासून दूर निघून जातात. जीप पलटी झाल्यानंतर गेंडे आणि पर्यटकांमध्ये नेमकं काय घडलं, हे व्हिडीओत पाहायला मिळत नाही. पण सुसंता नंदा यांनी प्राणी आणि माणसं सुखरुप असल्याचं ट्वीटरवर सांगितलं आहे.