पुणेकर हे त्यांच्या स्पष्ट बोलण्याच्या शैलीसाठी ओळखले जातात. यालाच काही लोक मोजक्या शब्दातील अपमान करणे असेही म्हणतात. पण पुणेकरांना मोजक्या शब्दात आपलं मत मांडता येतं हे खरं कौशल्य आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पुणेरी पाट्या देखील नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. सध्या अशीच एक पुणेरी पाटी चर्चेत आली आहे. एका रिक्षामध्ये ही पाटी लावण्यात आली असून त्यावर लिहिलेला संदेश वाचून लोकांना हसू आवरता येईना.
सोशल मीडियावर एका पुणेरी रिक्षावाल्याने आपल्या रिक्षामध्ये लावलेल्या पुणेरी पाटीचा फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोमध्ये पुणेरी पाटीवर रिक्षामध्ये बसणाऱ्या जोडप्यांसाठी लावण्यात आली आहे. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अथवा रिक्षामध्ये काही जोडपे अश्लील चाळे करतात. अशा जोडप्यांना ताकीद देणारी सुचना या पुणेरी पाटीवर लिहिली आहे. “नमस्कार, मी पुणेकर जोडप्यांना विनंती आहे गाडीत कुठल्याही प्रकारचे अश्लील चाळे करू नये अथवा पोकळ बांबूचे भरीव फटके दिले जातील” असा मजकूर या पाटीवर लिहिलेला दिसतो. एवढंच नाही याच मजकुराचे तोडक्या मोडक्या इंग्रजीत भाषांतर केले आहे जे फार मजेशीर आहे. “Hello, I am a Punekar couple, I am requesting you to do any kind of obscene Chala or a heavy wipping with hollow bamboo will be given.”असे इंग्रजी भाषांतर केलेल मजकूरही दिसत आहे. हा मजकूर शब्दश: भाषांतरीत केला आहे जो वाचून नेटकऱ्यांना त्यांचे हसू रोकता येत नाहीये.
हेही वाचा – मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाच्या जजला भारतीय पाणीपुरीची पडली भुरळ! खाता क्षणी….व्हिडीओ तुफान व्हायरल
हा फोटो pune_is_loveee नावाच्या पेजवर शेअर केलेला आहे. व्हायरल फोटोला जवळपास ८९५२३ पेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे. फोटोवर पुणेकरांना मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एकाने लिहिले, “ते इंग्रजी भाषांतर फार मजेशीर आहे” दुसऱ्याने लिहिले, “ही पाटी सर्व रिक्षावाल्यांनी लावली पाहिजे.” तिसऱ्याने लिहिले की, “हे खरे पुणेकर” तिसरा म्हणाला, ‘थेट मुद्दा मांडला”