आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं आपल्याला भेटतात. त्यातल्या अनेकांशी तर आपली घट्ट नाळ जोडली जाते. या माणसांचे आपल्यावर अनंत उपकार असतात, या उपकारांची परतफेड करण्याची संधी क्वचितच मिळते. अशाच योगागोयाची गोष्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आठ वर्षांपूर्वी एका रिक्षाचालकाने आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या तरूणीचे प्राण वाचवले होते. यानंतर आपल्या घराच्या शेजारीही न भटकण्याची विनंती या तरूणीने रिक्षाचालकाला केली. आज आठ वर्षांनंतर तरूणीने रिक्षाचलकाचे प्राण वाचवून या उपकारांची परतफेड केली. जीएमबी आकाश याने ‘फेसबुक’वर एक पोस्ट शेअर करून ही गोष्ट सांगितली.

बबलू शेख हातरिक्षा चालवतात. रिक्षा चालवून त्यांना जे काही पैसे मिळतात त्यावर त्यांचं कुटुंब चालतं. दिवसभर शहरातल्या रस्त्यावर रिक्षा चालवून बबलू घरी यायचे. पण त्यादिवशी मात्र तो दिवस त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा दिवस होता. नेहमीसारखी त्यांनी आपली हातरिक्षा एका प्रवाशाच्या दारात थांबवली. एक तरूण मुलगी त्या रिक्षात चढली. ती बसल्याबरोबर तिच्या वडिलांनी बबलूंना सूचना केल्या. ‘हिला नीट घेऊन जाण्याची जबाबदारी तुमची. रस्ता खराब आहे रिक्षा हळू चालवा तिला काहीही होता कामा नये’. बबलूंनी सूचना ऐकल्या अन् रिक्षा घेऊन चालू लागले.
रिक्षा तिच्या घरापासून काही दूर अंतरावर जात नाही तोच तिने ओक्साबोक्सी रडायला सुरूवात केली. तिचे हुंदके ऐकल्यानंतर बबलूंनी मागे वळून बघण्याचा प्रयत्नही केला. पण ‘मागं बघाल तर याद राखा असं म्हणत ती त्यांच्या अंगावर खेकसली.

बबलूने पुढे त्या दिवशी जो काही प्रसंग घडला तो आकाशने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मांडला. हे प्रसंग जसाच्या तसा मांडला आहे.
‘ ती सारखी कोणालातरी फोन करून रडत होती, विनवण्या करत होती. शेवटी तिने अचानक रिक्षा थांबवायला सांगितली. माझ्या हातात पैसे टेकवत ती धावत रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाली. ती कुठे जातेय, का जातेय काहीच कळायला मार्ग नव्हता. तिचा स्वभावही असा होता की काही विचारायची सोय नव्हती. मी पैसे घेतले आणि हातरिक्षा घेऊन निघालो. पण त्याचक्षणी तिच्या वडिलांचे शब्द आठवले. तिला सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी माझी असं त्यांनी सांगितलं होतं. मी तिला शोधायला गेलो तेव्हा ती समोरून येणाऱ्या ट्रेनच्या खाली आत्महत्या करण्याच्या तयारीत होती. मी तिला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी अशिक्षित असून, यात पडण्याची गरज नाही, असं म्हणत वाईट शब्द तिने मला ऐकवले. मला वाईट वाटलं. पण तिची मनःस्थिती ठिक नव्हती हेही मला कळत होतं. शेवटी तिला आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त करण्यास मी यशस्वी झालो. तीन तास काहीही न बोलता ती रडत होती. शेवटी तिला तिच्या घरी नेऊन सोडलं.’

‘निघताना ती माझ्याशी जे काही बोलली ते खूपच बोचणारं होतं. जे झालं त्याची वाच्यता कुठेही करायची नाही. मी तुम्हाला ओळखत नाही तुम्हीही मला ओळखत नाही असंच समजायचं आणि यापुढे इथे फिरकायचंही नाही. असं म्हणत ती निघून गेली. तिच्या तोंडून हे ऐकल्यावर मला वाईट वाटलं. त्यादिवशी आयुष्यात पहिल्यांदा वाटलं मला मुलगी नाही हे खूप बरं झालं.’

‘आठ वर्षांत ती मला कधीच भेटली नाही. काही दिवसांपूर्वी मला अपघात झाला. मला एका रुग्णालयात भरती करण्यात आलं, एक मुलगी माझ्यावर उपचार करत होती. ती माझ्याकडे बोट दाखवत एका मोठ्या डॉक्टरांना विनंती करत होती.’ मी आज डॉक्टर आहे ते केवळ यांच्यामुळे. ते माझे बाबा आहेत आणि यांच्यावर चांगले उपचार झालेच पाहिजे’. नंतर मला कळालं ही तीच मुलगी होती जिचे प्राण मी वाचवले होते. ही तीच मुलगी होती जी आत्महत्या करून आयुष्य संपवायला निघाली होती. ही तिच मुलगी होती जिने कधीही इथे न फिरकण्याची तंबी मला दिली होती. आज तीसुद्धा त्या रुग्णालयात डॉक्टर झाली होती.

Story img Loader