Rikshaw Viral Post : अपंग हा अक्षरी शब्द जरी उच्चारण्यासाठी सहज सोपा वाटत असला तरी या अपंगत्वाचा अनुभव घेणं कठीण व दु:खद आहे. काही जण जन्मापासून अपंग असतात, तर काही अपघातामुळे अपंग होतात. अशा अपंग लोकांचे जीवन सर्वसामान्य लोकांप्रमाणे नसते. समाजात वावरताना कळत-नकळतपणे त्यांना सतत विकलांगतेची जाणीव करून दिली जाते. इतकेच नव्हे, तर सतत घड्याळाच्या काट्यांवर धावणाऱ्या मुंबईसारख्या शहरांत अशा अपंग लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. घरातून बाहेर पडल्यापासून ठरावीक ठिकाणी पोहोचेपर्यंत त्यांना गर्दी, धक्काबुक्कीचा सामना करावा लागतो. अशा वेळी त्यांना फार जीव सांभाळून प्रवास करावा लागतो. त्यामुळे मुंबईतील एक रिक्षाचालक अपंग व्यक्तींच्या अडचणी लक्षात घेत, त्यांच्यासाठी एक कौतुकास्पद काम करीत आहे. त्याने अपंगांसाठी रिक्षाच्या मागे असे काही लिहिले आहे की, जे वाचून सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. सध्या या रिक्षाचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या या फोटोत तुम्ही पाहू शकता की, मुंबईतील काळी-पिवळी रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी आहे. त्या रिक्षाच्या मागे अपंग व्यक्तींना १.५ किलोपर्यंत मोफत प्रवास, असे लिहिले आहे. तो संदेश वाचल्यानंतर अनेकांनी चालकाने दाखविलेल्या माणुसकीचे कौतुक केले आहे. रिक्षाचालकाने रिक्षाच्या मागे असं नेमकं काय लिहिलं आहे ते जाणून घेऊ…
अशी ड्रायव्हिंग टेस्ट की लायसन्स पण नकोसे वाटेल! देताना १०० वेळा कराल विचार, VIDEO होतोय व्हायरल
रिक्षाचालकाच्या या कृतीमुळे अनेक अपंगांना दिलासा
रिक्षाच्या मागील बाजूस लिहिलंय की, अपंगांसाठी १.५ कि.मीपर्यंत प्रवास मोफत. चालकाच्या या कृतीतून त्याने खऱ्या अर्थाने माणुसकी अजून जपली जातेय हे दर्शवले, असे म्हणता येईल. अनेक अपंग व्यक्तींना हात, पाय नसतात, डोळ्यांनी नीट दिसत नाही; मग अशा वेळी त्यांना कुठेही प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण, रिक्षाचालकाच्या या कृतीमुळे अनेक अपंगांना दिलासा मिळत आहे. रिक्षाचालकाच्या या कार्याचे आता सर्वच जण कौतुक करीत आहेत.
रिक्षाचा हा फोटो नेमका कुठला आहे हे अद्याप समोर आलेले नाही; परंतु तो @shubhamjaiswal_31 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. अनेक जण या व्हिडीओच्या कमेंट्स बॉक्समध्ये वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले की, हे खूप छान आहे. एका छोट्या गोष्टीसाठी केलेले हे प्रयत्न खूप मोठे आहेत. दुसऱ्या युजरने लिहिले की, हे खरंच खूप चांगल काम आहे, यातून माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दिसून येते. तिसऱ्या युजरने लिहिले की, यातून माणुसकीचे दर्शन घडते. अशा प्रकारे युजर्स अनेक कमेंट्स करीत आहेत.