Cartoon Network च्या आठवणी सगळ्यांच्या लहापणीच्या आठवणी आहेत. टॉम अँड जेरी, मिकी माऊसपासून विविध प्रकारची कार्टून्स या कार्टून नेटवर्कवर पाहिलं नाही असा माणूस गेल्या काही वर्षांमध्ये मिळणं तसं विरळच. जगभरात या कार्टून नेटवर्कची चर्चा आहे. कारण अबालवृद्धांमध्ये हे चॅनल लोकप्रिय आहे. आज समाजमाध्यमावर #RIPCartoonNetwork हा हॅशटॅग ट्रेंड होतो आहे. एक्स या समाजमाध्यमावर हा ट्रेंड चर्चेत आला आहे. ज्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. आमच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या करणारं चॅनल बंद होतं आहे याचं आम्हाला दुःख होतं आहे असं अनेकांनी म्हटलं आहे. मनोरंजन क्षेत्रात अनेक घडामोडी घडत असतात. सिनेमा, चॅनल्स यांचे प्रोमो, टिझर, ट्रेलर व्हायरल होत असतात. अशात #RIPCartoonNetwork हा हॅशटॅग या व्हिडीओमुळेच ट्रेंड होऊ लागला आहे.
व्हिडीओत करोनाचाही उल्लेख
करोनाचा परिणाम अॅनिमेशन इंडस्ट्रीवर झाला. पहिल्या लाटेत मोठा फटका बसला. त्यानंतरही उभारी धरुन अॅनिमेशन करणाऱ्या अॅनिमेटर्सनी चांगलं प्रॉडक्ट देणं सुरु ठेवलं. मात्र आऊटसोर्सिंग वाढल्याने आणि अनेकांना कामावरुन काढून टाकण्यात आल्याने आता जवळपास अॅनिमेटर्सचं काम संपलं आहे असं या व्हिडीओत नमूद करण्यात आलं आहे. यामुळेच हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड झाला आहे.
RIPCartoonNetwork हा हॅशटॅग का चर्चेत आला?
Animation Workers Ignited या एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला की अॅनिमेशन करणाऱ्या अॅनिमेटर्सची आता गरज राहिली नाही. अॅनिमेशन करणाऱ्या काही कंपन्या लवकरच कर्मचारी कपात करतील आणि अॅनिमेशन व्यवसायही बंद करतील. यानंतरच एक्सवर लोक RIP कार्टून नेटवर्क हा हॅशटॅग ट्रेंड करु लागले आहेत.
सत्य नेमकं काय?
कार्टून नेटवर्क हे संपलेलं नाही किंवा त्यामध्ये कुठलीही कपातही तूर्त करण्यात आलेली नाही. किमान आत्तातरी या नेटवर्कमध्ये कुठलीही समस्या नाही. डिस्कव्हरीमध्ये विलीनीकरण झाल्यापासून कार्टून नेटवर्क तोट्यात आहे. तसंच वॉर्नर ब्रदर्सच्या इतर मालमत्तांचीही अवस्था फारशी बरी नाही. मात्र कार्टून नेटवर्क बंद झालेलं नाही. करोनाचा फटका या नेटवर्कला बसला, कर्मचारी कपातही झाली. मात्र तूर्त तरी हे बंद झालेलं नाही. कारण तशी कुठलीही अधिकृत माहिती चॅनलतर्फे किंवा त्यांच्या वेबसाईवर देण्यात आलेली नाही.
नेटकऱ्यांचं म्हणणं नेमकं काय?
अनेक नेटकऱ्यांनी #RIPCartoonNetwork हा हॅशटॅग ट्रेंड केला आहे. अनेकांनी कार्टून नेटवर्कच्या आठवणी जागवल्या आहेत. तर काहींनी अॅनिमेशन स्वरुपात कार्टून नेटवर्कला आदरांजली वाहिली आहे. कार्टून नेटवर्क पाहून आम्ही मोठे झालो आहोत. आज एक युग संपलं आहे असंही काहींनी म्हटलं आहे.
१९९६ मध्ये कार्टून नेटवर्क सुरु झालं. त्यानंतर या चॅनलचे लोगो बदलत गेले आहेत. Cartoon Network असा पूर्ण लोगो सुरुवातीला होता. त्यानंतर २००४ पासून CN असा आद्याक्षरं असलेला लोगो आला. हे बदलही पोस्ट करत कार्टून नेटवर्क बंद होतंय म्हणून लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे. काहींनी कार्टून नेटवर्कच्या सीईओंवर टीका केली आहे. डेव्हिड जेस्लाव्ह हे सातत्याने आपल्या आर्थिक फायद्यासाठी ते कायमच चुकीचे निर्णय घेतात असं म्हणत काही नेटकऱ्यांनी त्यांच्यावरही टीका केली आहे.