न्यूझीलंडचे नागरिक म्हणजे कशी माणसं समोर येतात तुम्हाला? गोरी? य़ुरोपियन दिसणारी? शक्य आहे. कारण आपल्याकडे आपल्या सगळ्यांचा तसाच समज आहे. न्यूझीलंडच्या क्रिकेट टीममध्येही सगळे गोरे साहेबच दिसतात. पण न्यूझीलंडमधले मूळ रहिवासी कोण आहेत माहीत आहे का? पुढचा फोटो पहा.

'माओरी'
‘माओरी’

या लोकांचं नाव आहे ‘माओरी’. अमेरिकेतले मूळ रहिवासीसुध्दा जसे गव्हाळ वर्णाचे रेड इंडियन्स होते, तसं न्यूझीलंडमधल्या मूळ रहिवाशांना माओरी म्हणतात ब्रिटिशांनी न्यूझीलंडमध्ये जशाजशा वसाहती उभारल्या तसतसं तिसल्या या मूळ रहिवाशांना त्यांनी त्यांच्याच प्रदेशात मागे लोटलं. त्यांचे अनेक परंपरागत हक्क नाकारले गेले आणि त्यांचे समाजच मुळापासून उखडून टाकले गेले.

पण आता न्यूझीलंडमध्ये एक अनोखी घटना घडली आहे. तिथल्या एका नदीला ‘मानवी हक्क’ देण्यात आलेत. माओरी समाजाला पवित्र असणाऱ्या या नदीला हा दर्जा देण्यात आलाय. म्हणजे या नदीला आता एका चालत्याबोलत्या, भावना असणाऱ्या मानवाचा दर्जा देण्यात आला आहे. वसाहती होण्याआधी शतकानुशतकं न्यूझीलंडच्या बेटांवर राहणाऱ्या आणि तिथल्या निसर्गाशी एकरूप झालेल्या या समाजाच्या जाणिवांना एका अर्थाने ही राजमान्यता देण्यात आली आहे.

भारतीय मनांमध्ये गंगा नदीला असलेल्या महत्त्वाच्या स्थानासारखं माओरी समाजात या नदीविषयी मोठी श्रध्दा आहे. आता या नदीला देण्यात येणाऱ्या नव्या दर्जामुळे या नदीसाठी न्यूझीलंडच्या संसदेत दोन प्रतिनिधीही असणार आहेत. या दोघांपैकी एक प्रतिनिधी माओरी समाजातला असणार आहे. हे प्रतिनिधी या नदीच्या स्वच्छतेविषयी काळजी घेणार आहेतच पण या नदीच्या प्रती माओरी समाजाच्या असणाऱ्या श्रध्दांना आधुनिकतेमुळे आणि डेव्हलपमेंटमुळे धक्का पोचणार नाही याचीही काळजी हे प्रतिनिधी घेणार आहेत.

नदी फक्त पाण्याचा एक प्रवाह नसतो तर ती जिथून वाहत जाते त्या सगळ्या प्रदेशात जीवन फुलवणारा एक व्यापक प्रवाह असतो. त्या त्या प्रदेशातल्या समाजजीवनामध्ये या नदीचं स्थान मोठं असतं. मग त्याचं प्रतिबिंब ‘संथ वाहते कृष्णामाई’ सारख्या गाण्यांमधून त्या त्या समाजात उमटत राहतं.

न्यूझीलंडमध्ये माओरी समाजाच्या लोकांच्याही अशाच भावनांची तिथल्या सरकारने दखल घेत त्यांना राजमान्यता दिल्याने या समाजात समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

Story img Loader