सध्या बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांना व्हाट्सअपवर जवळपास ४४ हजार मुलींनी लग्नासाठी मागणी घातली आहे अशी चर्चा आहे. तेजस्वी हे लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आहेत. राज्यातील खराब रस्त्यांच्या तक्रारी करण्यासाठी तेजस्वी यांनी फोन नंबर दिला होता. व्हाट्सअप करून नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले होते. मात्र याच नंबरवर तक्रारी कमी पण त्यांना लग्नाच्या मागण्या अधिक आल्याने ते चर्चेत आले आहे.
आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार तेजस्वी यांनी दिलेल्या व्हाट्सअप नंबरवर एकूण ४७ हजार संदेश आले होते. या संदेशाची छाननी करत असताना त्यात जवळपास ४४ हजार संदेशात मुलींनी त्यांना लग्नाची मागणी घातली होती. तर फक्त ३ हजार संदेशात रस्त्याविषयक तक्रारी होत्या. तेजस्वी यांनी दिलेला फोन नंबर हा त्यांचा वैयक्तीक फोन नंबर असल्याचे वाटल्याने या हजारो मुलींनी त्यांना लग्नाच्या मागण्या घातल्या आहेत. कहर म्हणजे मुलींनी आपली माहिती, उंची, वर्ण अशी विस्तृती माहिती देखील यात दिली. तेजस्वी यादव हे अविवाहित आहेत आणि सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात.