देशात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. वर्षभरात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनचालकाच्या चुकीने अपघात होतो. कधी चालकाला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते, तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. त्यामुळे रस्ते अपघात हा संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय बनला आहे. आता असाच एक अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अपघाताचे अनेक व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यापैकी काही व्हिडीओ पाहून खरोखरच थक्क व्हायला होते. आता अपघाताचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. काय घडले ते आपण नेमके जाणून घेऊ.
(हे ही वाचा : हीच खरी माणुसकी! पाण्यात पडला कुत्रा; वाचविण्यासाठी लोकांनी एकत्र येऊन पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी Video )
उत्तराखंडमधील टिहरीच्या बौराडी भागात पायी जात असलेली एक महिला आणि तिच्या दोन भाच्यांना सोमवारी संध्याकाळी भरधाव येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या धडकेत तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. धडक इतकी जोरदार होती की, महिला आणि तिच्या दोन भाची हवेत फेकल्या गेल्या आणि काही फूट दूरवर पडल्या. या भीषण अपघाताचा व्हिडीओ रस्त्याच्या कडेला असलेल्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे; जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
अपघाताबाबत पोलिसांनी सांगितले की, कारने धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला; तर दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी कारचालकाला अटक केली आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, रीना नेगी (३६) या त्यांच्या दोन भाच्या अग्रीमा नेगी (१०) व अन्विता (७) यांच्यासोबत सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पालिका कार्यालय रस्त्यावरून चालल्या होत्या. तेव्हा जखनीधरचे गटविकास अधिकारी डीपी चमोली यांच्या भरधाव कारने तिघांनाही चिरडले.
येथे पाहा व्हिडिओ
कारचालकाला अटक
या अपघातात रीनाचा जागीच मृत्यू झाला; तर अग्रीमा व अन्विता यांना जिल्हा रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आरोपी चालक चमोली याला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात येत आहे. या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत आणखी दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे जिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित राय यांनी सांगितले.