मोठ मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा रस्त्यावर मिळणा-या विक्रेत्यांकडे पोटभर स्वस्तात मस्त खाणारे शौकिन अनेक असतात. पण चेन्नईच्या रस्त्यावर अशी खाबुगीरी करणा-यांनी सावधान ! चेन्नईमधल्या रस्त्यावर मिळणा-या बिर्याणीमध्ये मटणाऐवजी मांजरीचे मांस मिसळले जात असल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडियाने’ दिले आहे. तामिळनाडू पोलीस, प्राणी कल्याण संस्था आणि पिपल्स फॉर इंडिया या स्वयंसेवी संस्थेने मिळून पाल्लावरम येथून १६ मांजरांची सुटका केली आहे. या मांजरींना मांसासाठी पिंज-यात कैद करून ठेवले होते. चेन्नईच्या अनेक रस्त्यावरील दुकानांमध्ये मांजरीचे मांस पुरवले जात असल्याची महिती पिपल्स फॉर अॅनिमलला मिळाल्याचे या वृत्तात म्हटले आहे. हे मांस रस्त्यावर मिळणा-या स्वस्त बिर्याणी विक्रेत्यांना विकले जायचे. या स्वयंसेवी संस्थेच्या दोन कार्यकर्त्यांनी या ठिकाणाला भेट दिली आणि त्याचा व्हिडिओ बनवून तो पोलिसांच्या हाती दिला. यात काही स्थानिक मुलेही असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. पोलिसांनी या मांजरांची सुटका केली असून पुनर्वसन केंद्रात त्यांना पाठवण्यात आले आहे. एका लहानशा पिंज-यात या मांजरांना ठेवले जात होते. शेजारच्या परिसरातून मांजरांची चोरी करून त्यांना येथे आणले जायचे.

Story img Loader