गॉन इन ६० सेकंड्स हा हॉलिवूडचा चित्रपट अनेकांना आठवत असेल. ६० सेकंदात चोरी करण्याचा प्रसंग चित्रपटात दाखवला गेला आगहे. अशाच पद्धतीने गुजरातमध्ये एक चोरी झाली आहे. अहमदाबादच्या कृष्णा नगरमध्ये दिवसा ढवळ्या एक चोर महिलेच्या वेशात येऊन सोन्याच्या दुकानाबाहेरून २८ किलो चांदी पळवतो. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अवघ्या २१ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये चोर येतो, बॅग हिसकावतो आणि क्षणाधार्त पळूनही जातो. ज्वेलर्सच्या बाहेरून दिवसाढवळ्या रस्त्यावर अनेक माणसं असतानाही ही चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे चोराने महिलेचा वेश परिधान केलेला आहे. त्याने चेहरा साडीच्या पदरानं झाकलेला दिसतो. ज्वेलर्सच्या दुकानातील एक कर्मचारी दुकानाबाहेर चांदीने भरलेली बॅग घेऊन कुठेतरी जाताना दिसत आहे. मात्र दुचाकीवर बसलेला हा कर्मचारी फोनवर बोलण्यासाठी काही वेळ थांबतो. याच वेळेत चोर चोरी करून निघून जातो.

हे वाचा >> बाई काय हा प्रकार! दुर्गा पूजेला तोकडे कपडे घालून दर्शन; टीका होताच मॉडेलने पोस्ट केला ‘तसा’ फोटो

व्हिडीओत दिसल्याप्रमाणे चोर कर्मचाऱ्याच्या मागून शांतपणे येतो आणि दुचाकीवर बसलेल्या कर्मचाऱ्याच्या हातून बॅग हिसकावतो. या बॅगेत २८ किलोचे चांदीचे दागिने असल्याचे सांगितले जाते. दुचाकीवरील कर्मचारी दुचाकीवरून उतरणार तेवढ्यात चोर पुढे पळत जातो. काही पावलांवर दुसरा एक चोर दुचाकीवर बसलेला दिसत आहे. बॅग घेऊन गेलेला चोर दुचाकीवर येऊन बसताक्षणीच दुचाकीस्वार जोरात दुचाकी पळवतो.

२३.५ लाख रुपयांचा मुद्देमाल पळवला

ज्वेलर्सने दिलेल्या माहितीनुसार दोन चोरांनी चोरलेल्या मुद्देमालाची रक्कम २३.५ लाख असल्याचे सांगितले. या चोरीचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्या कर्मचाऱ्याच्या दुचाकीवरून सदर बॅग चोरी करण्यात आली, तो कर्मचारी दुचाकी सुरू करेपर्यंतच चोर पसार होताच.

हे ही वाचा >> माजी क्रिकेटपटू अजय जडेजा झाला ‘राजा’, या संस्थानाच्या गादीवर होणार विराजमान

तक्रार दाखल

सदर घटना बुधवारी (९ सप्टेंबर) घडली. यानंतर ज्वेलर्सच्या वतीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार विकेश शाह यांनी सांगितले की, आमचा कर्मचारी दुकानाबाहेर थांबलेला असताना त्याच्याकडून २८ किलो चांदीचे दागिने चोरी झाले. महिलेच्या वेशात आलेल्या एका चोराने ही बॅग घेऊन पळ काढला.