Rohit Pawar saves Bird : राजकीय व्यक्ती नेहमी आक्रमक भाषण करताना, विरोधकांवर हल्लाबोल करताना दिसतात. आंदोलनं आणि मोर्चांमध्ये तसेच सभांमध्ये नेते मंडळींचं आक्रमक रूप आपल्याला पाहायला मिळतं. परंतु काही नेतेमंडळी खासगी आयुष्यात खूप संवेदनशील असतात. कुटुंबावरील एखाद्या संकटाच्या काळात काही नेत्यांची हळवी बाजू समोर येते. तर काही नेते प्राणी आणि पक्ष्यांप्रती खूप संवेदनशील असल्याचं पाहायला मिळतं. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारांची देखील अशी संवेदनशील बाजू नुकतीच पाहायला मिळाली.
राज्यात अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातले अनेक आमदार, मंत्री तसेच इतर नेतेमंडळी सध्या अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करताना दिसत आहेत. आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघात म्हणजेच कर्जत-जामखेडमध्ये देखील पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे रोहित पवारांनी आज त्यांच्या मतदार संघातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत असताना एका ठिकाणी द्राक्षांच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यात साळुंकी (लांडी) अडकलेली रोहित पवारांनी पाहिली. त्यानंतर रोहित पवारांनी लगेच पुढे जात त्या पक्ष्याला (या पक्ष्याला मैनादेखील म्हणतात) जाळ्यातून मुक्त केलं. याचा व्हिडीओ रोहित पवारांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
हे ही वाचा >> “महायुतीत अजित पवार…”, मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य, म्हणाले, “भाजपा आणि आमचं टार्गेट सेट”
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रोहित पवारांनी लिहिलं आहे की, “मतदारसंघात अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना द्राक्षाच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या साळुंकीला (लांडी) जाळ्यातून सोडवून मुक्त केलं… काम तसं कणभर पण आनंद मात्र मनभर देऊन गेलं…”