Rohit Sharma & Virat Kohli Emotional Msg Video: विश्वचषकाच्या अंतिम टप्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात भारताच्या वाट्याला आलेला पराभव हा १४० कोटी भारतीयांचे मन दुखावून गेला. कर्णधार रोहित शर्मा, किंग कोहली आणि भारतीय संघातील खेळाडूंना मैदानावर हतबल झालेले पाहणं हा सर्वांसाठी भावुक क्षण होता. आता काही दिवसांनी रोहित शर्मा आणि कोहलीचे नवे व्हिडीओ चर्चेत आहेत. यामध्ये रोहित व कोहली भारतीय चाहत्यांची क्षमा मागताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकात भारताच्या पराभवानंतर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे पण लाईटहाऊस जर्नालिज्मने व्हिडिओबाबतची एक बाब अनेकांच्या लक्षात आणून दिली आहे.
काय होत आहे व्हायरल?
युट्युब चॅनेल ‘Cric7 Videos’ ने रोहित शर्मा चा व्हायरल व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओ वर जवळपास 3.7 मिलियन व्युज एका दिवसातच झाले होते.
इतर सोशल मीडिया प्रोफाइल देखील व्हायरल व्हिडिओ शेअर करत आहेत.
इतर व्हिडिओमध्ये विराट कोहलीचा भावनिक संदेश आहे, जो YouTube चॅनेल ‘द क्रिकेट चस्का’ ने शेअर केला आहे.
तपास:
आम्ही या दोन्ही व्हिडिओंची स्क्रीन ग्रॅब करून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला. रोहित शर्माच्या व्हिडिओवरून मिळालेल्या स्क्रीनवर आम्ही Yandex सर्च केले. रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांच्यातील व्हिडिओ मुलाखतीचा हा व्हिडिओ आहे हे यातून लक्षात आले. त्यानंतर आम्ही गूगल कीवर्ड सर्च करताच मुलाखतीचा मूळ व्हिडिओ सापडला.
हा व्हिडिओ तीन वर्षांपूर्वी NTV Sports वर अपलोड करण्यात आला होता. आठव्या मिनिटावर तुम्हाला व्हायरल झालेला व्हिडिओ दिसून येईल.आम्हाला सुरेश रैनाची एक इंस्टाग्राम पोस्ट देखील सापडली जिथे त्याने रोहित शर्मासोबत इन्स्टा लाईव्हची घोषणा केली होती.
विराट कोहलीच्या व्हिडिओबाबतही आम्ही ही प्रक्रिया केली. व्हिडीओ InVid टूलमध्ये अपलोड केल्यावर काही कीफ्रेम मिळाल्या आणि त्यावर आम्ही रिव्हर्स इमेज सर्च केले. आम्हाला विराट कोहलीने त्याच्या X (ट्विटर) प्रोफाइलवर अपलोड केलेला व्हिडीओ आढळून आला.
२०१८ मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने २४ मे २०१८ रोजी त्याच्या प्रोफाइलवर व्हिडिओ शेअर केला होता.
निष्कर्ष: रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भावनिक संदेशांचे दोन्ही व्हिडिओ जुने आहेत आणि नुकत्याच झालेल्या विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवाशी व्हिडिओंचा संबंधित नाही.