ओयो हॉटेल्स म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीमधलं मोठं नाव. सध्या यशाच्या शिखरावर असलेल्या या कंपनीची उलाढाल कोटींच्या घरात आहे. परंतु ओयोमधून बुकिंग केल्याने ९ मित्रांच्या ग्रुपला मात्र नाहक त्रास सहन करावा लागला आहे. या ग्रुपमधील सदस्य अभिशांत पंत याने लिंक्डइनवर आपला ओयोबाबतचा अतिशय वाईट अनुभव सांगितला आहे. अभिशांत यांच्या पोस्टनुसार त्यांनी पुदुच्चेरी येथे एका हॉटेलचं बुकिंग केलं होतं. हा ९ जणांचा ग्रुप २४ डिसेंबरच्या रात्री हॉटेलमध्ये पोहोचणार होता. जाणून घेऊया त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं.
त्याचं झालं असं, अभिशांत पंत यांनी आपल्या ग्रुपसाठी ओयो ७४६१२ रॉयल प्लाझा बोर्डिंग अँड लॉजिंगचं बुकिंग केलं होतं. परंतु तिथे पोहचल्यावर मात्र त्यांना अत्यंत भयानक अनुभव आला. हॉटेलच्या ठिकाणी पोहचल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांनी बुक केलेलं हॉटेल अस्तित्वातच नाही. अभिशांत यांनी आपल्या लिंक्डइन वरील पोस्टमध्ये हॉस्पिटॅलिटीमध्ये आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितलं आहे.
हॉटेलच्या ठिकाणी पोहोचल्यावर असा उडाला गोंधळ
अभिशांत आपल्या मित्रांसोबत हॉटेलच्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा त्यांना हॉटेल सापडलं नाही. रात्रीच्या ११ वाजेपर्यंत त्यांनी आजूबाजूला तपास केला परंतु त्यांच्या निदर्शनास आलं कि आसपास त्यानावाचे कोणतेही हॉटेल नाही. एवढ्या रात्री ते एका भयानक आणि सुनसान रस्त्यावर अडकलेले होते. त्यानंतर त्यांनी कस्टमर केअरला कॉल करण्याचा निर्णय घेतला पण त्यांना सांगण्यात आलं की या नावाची कोणतीही प्रॉपर्टी अस्तित्वातच नाही.
अभिशांत यांनी अत्यंत ही पोस्ट विस्तृतपणे लिहिली आहे. त्यांनी लिहिलंय, ‘ओयोमध्ये राहण्याची भीती : मला २४ डिसेंबरच्या रात्री हॉस्पिटॅलिटीमध्ये अत्यंत वाईट अनुभव मिळाला. आम्ही पुदुच्चेरीमध्ये ओयो ७४६१२ रॉयल प्लाझा बोर्डिंग अँड लॉजिंग बुक केलं आणि रात्री तिथे पोहचल्यावर आम्हाला कळालं की हे हॉटेल अस्तित्वातच नाही. ही जागा किती भयानक आणि सुनसान आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहा. आम्ही रात्री ९ वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत तिथेच उभे होतो.’ अभिशांत यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आपल्या पोस्ट सहित शेअर केला आहे.
दरम्यान, अभिशांत यांना आलेला अनुभव आपल्याला देखील येऊ शकतो त्यामुळे कोणतीही गोष्ट ऑनलाइन बुक करत असताना त्याची सत्यता नीट पडताळून पाहा.