Royal Bengal Tiger Viral Video : पट्टीच्या पोहणाऱ्याला घाम फुटेल पण रॉयल बंगाल टायगरचा नादच वेगळा आहे. गुवाहाटीच्या ब्रम्हपुत्रा नदीत पोहणाऱ्या वाघाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. वाघ ब्रम्हपुत्रा नदीच्या पाण्यातून पोहत जवळपास १६० किमी अंतरापर्यंत पोहोचल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर दहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला शांत करुन प्राणी संग्रहालयात सोडण्यात आले. वाघ नदीच्या पाण्यात वेगाने पोहत असल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. हा संपूर्ण थरार गुवाहाटी जवळच्या पीकॉक बेटाजवळ कॅमेरात कैद करण्यात आला आहे. वाघ नदीच्या पाण्यात पोहत असल्याचं उमानंदा मंदिरात काम करणाऱ्या कामगारांनी पाहिलं, त्यानंतर त्यांना धक्काच बसला. बेटाजवळ असलेल्या छोट्या गुहेत जाण्यासाठी वाघाचा प्रयत्न असल्याची माहिती समोर आलीय.
रॉयल बंगाल टायगरचा नदीत पोहतानाचा व्हिडीओ झाला व्हायरल
बेटापासून १२० किमी अंतरावर असलेल्या ओरंगा राष्ट्रीय उद्यानात भटकणारा वाघ ब्रम्हपुत्रा नदीच्या पाण्यात पोहत आल्याचा संशय वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गुवाहाटी शहरापासून ब्रम्हपुत्रा नदीतून स्पीड बोटीने प्रवास केल्यास ओरंगापर्यंत जाण्यासाठी दहा मिनिटांचा कालावधी लागतो. वाघाला पाण्यात पाहिल्यानंतर बेटावर असणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, वाघ नदीत असल्याची माहिती मिळताच एनडीआरफचं पथक स्थानिक पोलिसांसोबत घटनास्थळी पोहोचलं. तसंच वन विभागाचे अधिकारी आणि पशु चिकिस्तक आणि बचाव पथकही बोटीतून वाघाच्या ठिकाणी पोहचले.
इथे पाहा व्हिडीओ
“वाघ दोन मोठ्या खडकांमध्ये अडकला असल्याने संबंधीत बचाव पथकांना मोठी कसरत करावी लागली. परंतु, बचाव पथकाने संपूर्ण काळजी घेऊन वाघाची सुखरुप सुटका केली आणि त्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. वाघाचा सुरक्षितपणे बाहेर काढलं नसतं, तर तो पुन्हा पाण्यात पडला असता. जर त्याला सुरक्षीत बाहेर काढण्यात अपयश आलं असतं, तर त्याने बचाव पथकावर हल्ला केला असता,” अशी माहिती एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना दिलीय. उमानंदा मंदिरात भक्तांची गर्दी होती, अशा परिस्थितीतही वाघाची बचाव पथकाने सुरक्षीतरित्या सुटका केली.