सोशल मीडिया हे एकमेकांशी संवाद साधण्याचे उत्तम साधन आहे. पण या संवादाचे काही नियम असतात. हे नियम पाळणं प्रत्येकाला गरजेचं असतं. त्यातूनही अशा माध्यमांचा वापर करून मुलींना मेसेज पाठवताना काही साध्या आणि सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. या गोष्टी लक्षात ठेवल्या तर दोघांमधला संवाद उत्तम होऊ शकतो. व्हॉट्सअॅप, फेसबुक, हँगआउट यासारख्या माध्यमातून आपण एकमेकांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो पण या माध्यमातून ‘तिला’ मेसेज करताना काही साध्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमच्यामधला संवादाचा धागा अधिकच मजबूत होईल.
आदर : मेसेज करताना आपण एका मुलीला मेसेज करतो आहे हे नेहमीच लक्षात ठेवा. त्यामुळे तिच्याशी बोलताना तिच्याप्रती आदर हा असलाच पाहिजे. उत्तम संवादाचा हा पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे. तिच्यातील स्त्रित्त्वाचा आदर करणं हे प्रत्येक पुरुषाला आलेच पाहिजे.
मर्यादा : मेसेज करण्याचा पुढाकार तिने घेतला असो किंवा त्याने. प्रत्येकाला आपल्या मर्यादा माहिती असायलाच हव्यात. आपण कोणत्या कारणासाठी संवाद साधतो आहे हे मनात स्पष्ट असले पाहिजे. जर संवादाची पातळी काही कारणाने ओलांडत असेल तर आपल्याला आपल्या मर्यादेची जाणीव वेळीच झाली पाहिजे. अशा वेळी नमतं घेत तो संवाद तिथेच थांबवणं केव्हाही योग्य ठरेल.
वाचा : मुलांच्या ‘या’ गोष्टींवर मुली होतात फिदा!
विषय : कधी कधी संवाद साधण्याचे कारण बाजूलाच राहते आणि विषयाला फाटे फुटतात. विषय भरकटतो तेव्हा आपल्याला कोणत्या विषयावर बोलायचे आहे याचे भान असले पाहिजे. बरेचदा मुलींना विषयाला फाटे फोडलेले आवडत नाहीत. जेवढ्यास तेवढे बोलले की भांडणे होण्याची शक्यता ही कमी होते.
अतिरेक टाळा : मुलींना मेसेज करताना अतिरेक करणे टाळा. भलेमोठे मेसेज करणे किंवा सारखा मेसेज करून त्रास देणे टाळा. सुरुवातीला जरी सारे आलबेल वाटत असले तरी नंतर मात्र याचा मुलींना राग येऊ लागतो. तेव्हा मेसेज करताना सारखे मेसेज करून संवाद अधिक रटाळ आणि कंटाळवाणा बनवू नका.
भाषा : मित्राला मेसेज करणं आणि मैत्रिणीला मेसेज करणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. तेव्हा मेसेज करताना आवर्जून आपल्या भाषेवर लक्ष द्या. आपण कोणते शब्द वापरत आहोत, यावरून मुली तुमची प्रतिमा ठरवत असतात त्यामुळे शक्यतो शिव्या किंवा तशाच प्रकारची वाक्य संवादात आणू नका.
रागात किंवा मद्यपान करून मेसेज करू नका : सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे रागात किंवा मद्यपान करून मुलींना मेसेज करणं टाळा. अशावेळी आपल्या मनावर आपला ताबा नसतो तेव्हा आपल्या हातून अनावधानाने चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असते.