सोशल मीडिया हे एक असं व्यासपीठ आहे जे रातोरात एखाद्या व्यक्तीला स्टार बनवू शकतं. रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाणं गाणाऱ्या रानू मंडल यांचंही आयुष्य सोशल मीडियामुळेच बदललं. त्यांचा एक गाण्याचा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आणि नंतर सेलिब्रिटींनीही त्यांची दखल घेतली. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. एका तरुणाचा गाणं गातानाचा हा व्हिडीओ असून तो तरुण रानू मंडल यांचा मुलगा तर नाही ना, अशी चर्चा होत आहे.
या व्हिडीओत कुमार सानू यांच्या आवाजातील ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार करते है..’ हे गाणं गाताना हा तरुण दिसतोय. भिंतीला टेकून उभा असलेल्या या तरुणाचा आवाज नेटकऱ्यांना मंत्रमुग्ध करत आहे. एकीकडे रानू मंडल यांना लता मंगेशकर यांची कॉपी असल्याचं म्हटलं जात होतं तर आता या तरुणाला कुमार सानू यांची कॉपी असल्याचं म्हटलं जात आहे.
नेटकरी जरी या व्हिडीओतील तरुणाला रानू मंडल यांचा मुलगा म्हणत असले तरी याबाबत अद्याप काही मिळू शकलेली नाही. या व्हिडीओला फेसबुकवर दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
रानू यांच्या व्हायरल व्हिडीओनंतर सेलिब्रिटींनीही त्यांची दखल केली. गायक-संगीतकार हिमेश रेशमियाँने त्यांच्याकडून पार्श्वगायनसुद्धा करून घेतलं. इतकंच नव्हे तर सलमान खानने रानू यांना जवळपास ५० लाख रुपयांचं घरसुद्धा घेऊन दिल्याची चर्चा होती.