युक्रेनमधल्या युद्धामुळे जगभरात धुमाकूळ माजला आहे. युद्धाचे परिणाम आता घराघरात जाणवू लागलेत. रशियाकडून सुरू असणाऱ्या बॉंम्ब वर्षावात युक्रेन होरपळून निघतोय. या युद्धाला १२ दिवस झाले आहेत. अशात युक्रेनमधल्या युद्धातील काही फोटोज आणि व्हिडीओज समोर आले आहेत. युक्रेनच्या किव्ह शहरात युद्ध सुरु असतानाच युक्रेनच्या जवानाने युद्धभूमीवर केलेल्या लग्नाचे फोटोज सोशल मीडियाावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या हा फोटो युक्रेनमधल्या 112 ब्रिगेड सीमा सुरक्षा दलातील जवानाचा आहे. युक्रेनमध्ये एकीकडे शहरात गोळीबार आणि बॉम्ब शेलिंग सुरू असतानाचा युद्धभूमीवर लढता लढता या जोडप्याने चक्क युद्धभूमीवरच लग्न केलं. हे ऐकून सुरूवातीला तुम्ही आश्चर्य व्हाल. पण या अनोख्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.
लेसा आणि व्हालेरिय असं या जोडप्यांंचं नाव आहे. गेल्या रविवारीच या दोघांनी लग्न केलं. याचे काही फोटोज कीव्ह पोस्ट या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आले आहेत. ‘आज युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू असताना सीमा सुरक्षा दलातील 112 ब्रिगेडच्या लेसा आणि व्हालेरिय यांनी लग्न केले. लष्करातील एका धर्मगुरूने त्यांचे लग्न लावून दिले.’ असं या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वीच आणखी एका जोडप्याने युक्रेनच्या ओडेसामधील एका बॉम्ब शेल्टरमध्ये विवाह केला होता. बॉम्ब शेल्टरमध्ये पार पडलेल्या या लग्नाचे फोटोज बेलारूसमधल्या एका मीडिया हाऊसने शेअर केले होते. यात नवरदेवानेे युनिफॉर्म परिधान केला होता तर नवरीने हातात फुलपुष्पगुच्छ पडकलेलं दिसून आलं.
आणखी वाचा : Russia Ukraine War: युद्धग्रस्त युक्रेनमध्ये शेकडो लोक Airbnb बुक करत आहेत, कारण…
युक्रेनकडून रशियन फौजांचा प्रतिकार सुरू आहे. तर, दुसरीकडे रशियाकडून होत असलेल्या हल्ल्याने युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. युद्ध थांबवण्यासाठी जागतिक पातळीवरून रशियावर दबाव आणला जात आहे. दरम्यान, रशियाने युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यांनी युक्रेनसमोर चार अटी ठेवल्या आहेत.
युक्रेनमधील माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. या अटी मान्य केल्यास त्वरीत युद्ध थांबवण्याची तयारी रशियाने दाखवली असल्याचे युक्रेनच्या माध्यमांनी म्हटले आहे.