रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं आहे. युक्रेनमधील अनेक भागांवर रशियाकडून हल्ले सुरु आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. असं असताना शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या एका महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलेकडे दोन अत्याधुनिक बंदुका दिसत आहेत. महिलेच्या हातात एक बंदूक असून दुसरी बंदूक आणि गोळ्या जवळच टेबलावर ठेवल्याचे दिसत आहे. फोटोतील महिलेचे नाव अॅलिसा असून ती मूळची युक्रेनची राजधानी कीवची आहे. अॅलिसाचे वय ३८ वर्षे असून तिला ७ वर्षांचं एक मूलही आहे. अलिसा सशस्त्र दलांच्या मिलिटरी रिझर्व्ह नावाच्या प्रादेशिक संरक्षण दलात सामील झाली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या दलात सामील होण्यासोबतच अॅलिसा सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेत मीडिया रिलेशन स्पेशलिस्ट देखील आहे. अॅलिसाने तिच्या ऑफिस जॉबसोबत शूटिंगचे प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर लढाऊ कौशल्ये शिकली. यासाठी तिला सुमारे एक वर्षांचा कालावधी लागला. त्यानंतर ती डिफेन्स युनिटमध्ये रुजू झाली. असं असलं तरी अॅलिसाने आपले कौशल्य युद्धात वापरावे असे तिला वाटत नाही. कारण ती युद्धाकडे विनाशाच्या नजरेने पाहते.
अॅलिसाकडे दोन कॅलिबर गन आहेत. त्यापैकी एक ती तिच्या घरी ठेवते आणि दुसरी प्रशिक्षणा दरम्यान वापरते. तिने वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, ‘युद्धाच्या वातावरणात असुरक्षित ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी कसे जायचे हे मला माहीत आहे. आग लागल्यास काय करावे हे मला समजते. मित्र, नागरिक किंवा माझे शेजारी आगीत अडकल्यास कशी मदत करावी हे मला माहीत आहे.’
अॅलिसाला मोटारसायकलची आवड असून तिने पतीसोबत जवळपास ५० देशांचा प्रवास केला आहे. अॅलिसा न चुकता नित्याने प्रशिक्षणाचे धडे गिरवते. ती म्हणाली, ‘कोणत्याही परिस्थितीत प्रशिक्षण चुकू नये यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करते. मला प्रशिक्षणाला जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मला नेहमीच नवीन कौशल्ये शिकायला आवडतात, ज्यामुळे माझा आत्मविश्वास आणि धैर्य वाढते.’