रशिया आणि युक्रेन युद्धामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. युद्धाने अनेकांचा जीव घेतला. काळीज पिळवटून टाकणारे फोटो आणि व्हिडीओ रोज समोर येत आहेत. व्हिडीओ आणि फोटोतील विदारक दृश्य पाहून वेदना होतात. विचार करा की, प्रत्यक्षात वेदना सहन करणाऱ्यांची काय परिस्थिती असेल? केवळ मानवच नाही तर तिथले प्राणीही मरत आहेत. काही जनावरे अन्नाअभावी उपासमारीने मरण पावत आहेत. आता युक्रेनमधून असाच एक फोटो समोर आला आहे, हा फोटो पाहून तुम्हालाही वेदना होतील. रशियाने २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेनवर हल्ला चढवला. या युद्धाला आज ४४ दिवस पूर्ण झाले आहेत.
एक फोटो NEXTA नावाच्या मीडिया संस्थेने ट्विटरवर शेअर केला आहे, त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, कुत्र्याने मृत्यूनंतरही मालकाला एकटे सोडले नाही.कीवमध्ये या व्यक्तीची रशियन लोकांनी हत्या केल्याचं पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. हा फोटो पाहून तुम्हाला जपानी कुत्रा हाचिको आठवेल, ज्याने मालकाच्या मृत्यूनंतर ९ वर्षे वाट पाहिली आणि अखेरीस तेथेच त्याचा मृत्यू झाला.
दुसरीकडे, रशियन ताब्यादरम्यान, कीव ओब्लास्टमधील बोरोद्यांका येथील प्राणी निवारामध्ये ३५५ कुत्रे मरण पावले आहेत. निवाऱ्यात अन्न आणि पाण्याअभावी त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. प्राणी हक्क संघटना युनिमल्सच्या म्हणण्यानुसार येथे फक्त १५० कुत्रे उरले आहेत. काही ठिकाणी कुत्र्यांच्या मृतदेहांचा ढीग असल्याचं देखील फोटो व्हायरल होत आहेत.